पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता त्याच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका जुन्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंब चांगलंच गोत्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे हिट अँड रनचं प्रकरण घडल्यानंतर अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचीही गंभीर दखल घेतली आहे. पुणे गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलावलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय मुद्दे समोर येतात? सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशीनंतर सुटका होणार की अटक? हे चौकशी संपल्यानंतरच समजणार आहे. तसेच ही चौकशी किती तास चालेल याची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहे प्रकरण?
सुरेंद्र अग्रवाल यांचा त्यांच्या भावाशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी 2007 आणि 2008मध्ये बँकाकला जाऊन छोटा राजनची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारीही छोटा राजनला दिली होती. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल आहे. त्यावेळी पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरणात पोलीस मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल करतात. पण या प्रकरणात केवळ आयपीसीच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता. सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना अटकही केली नव्हती. छोटा राजनला अटक केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण उजेडात आलं असून पोलिसांनी पुन्हा एकदा सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरू केली आहे.
प्रकरण काय?
18 मे रोजी अल्पवयीन आरोपीलने दारुच्या नशेत प्रचंड वेगात पोर्शे कार चालवली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 15 तासात त्याची सुटका करण्यात आली होती. त्याला जामीन देण्यात आला होता. कोर्टाने त्याला 300 शब्दात निबंध लिहायला सांगितलं होतं.