Pune Porsche Accident : बुडत्याचा पाय खोलात…अग्रवाल कुटुंबाविरोधात आणखी एक तक्रारदार पुढे, काय आहे प्रकरण ?

| Updated on: May 27, 2024 | 12:24 PM

अग्रवाल कुटुंबियाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन होते, त्यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नेत्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा आरोप आहे. अग्रवाल कुटुंबियांविरोधात कोणाची तक्रार असल्यास पुढे यावे असे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते.

Pune Porsche Accident :  बुडत्याचा पाय खोलात...अग्रवाल कुटुंबाविरोधात आणखी एक तक्रारदार पुढे, काय आहे प्रकरण ?
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना उडवल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या अपघाताला जबाबदार अल्पवयीन मुलगा, त्याच्या हातात गाडी देणारे आणि अपघातानंतर पुराव्यांमध्ये फेरफार करणारे त्याचे वडील विशाल अग्रवाल हे तर पोलिसांच्या ताब्यात आहेतच. पण आता त्या मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे देखील पोलिसांच्या रडारवर आले असून याप्रकरणी आणि आणखी एका जुन्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरवर दबाव टाकत अपघाताचा आळ स्वत:वर घेण्यास सांगितला होता. यामुळे आता नातू, वडील आणि आजोबा तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अग्रवाल कुटुंबियाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन होते, त्यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नेत्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा आरोप आहे. अग्रवाल कुटुंबियांविरोधात कोणाची तक्रार असल्यास पुढे यावे असे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. आता याप्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली असून अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार पुढे आला आहे. दत्तात्रेय कातोरे असे त्यांचे नाव असून ते अग्रवाल कुटुंबाविरोधातपोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत.

कातोरे हे अग्रवाल यांच्या ‘ब्रह्मा’बिल्डर्स कंपनीत काम करत होते. अग्रवाल कुटंबाकडे कातोरे यांचे 84 लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र ते पैसे मिळत नसल्याने त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. आपल्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी कातोरे हे पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण ?

2000 ते 2005 दरम्यान कातोरे हे ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे खोदाईचे काम करत होते. या कामाचे अग्रवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी होते. त्यातील 76 लाख 50 हजार मिळतील, असं सांगितलं होतं. त्यातील 8 लाख हे कोरोनाच्या आधीचं बिल होतं, ते पैसै मागण्यासाठी माझा मुलगा त्यांच्या ऑफीसमध्ये रेसिडन्सी क्लबला गेला होता. मात्र माझ्या मुलाला पैसे काही मिळाले नाहीत, पण त्याला उलटसुलट बोलून तेथून हाकलून लावण्यात आलं. त्यामुळे माझ्या मुलाने टेन्शनमध्ये येऊन घरी जाऊन त्याचं आयुष्य संपवलं, असे वडील दत्तात्रेय कातोरे यांनी सांगितलं.

याप्रकरणी आम्ही एफआयर करणार होतो, पण त्यांचे ( अग्रवाल) वकील चंदननगर पोलिस स्टेशनला आले आणि म्हणाले की आमच्याविरुद्ध एफआयआर देऊ नका, आम्ही तुमचे पैसे देतो असे आश्वासन दिले. त्यातील थोडीफार रक्कम आम्हाला दिली पण उर्वरित रक्कम परत देण्याबद्दल त्यांनी काही नावच काढलं नाही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. उर्वरित पेमेंट, पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत अशी मागणी कातोरे यांनी पोलिसांकडे केली आहे.

शिवसेना नेत्याची दिली होती हत्येची सुपारी

या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवालही सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रॉपर्टीच्या मुद्यावरून सुरेंद्र यांचा त्यांच्या भावाशी वाद सुरू होता. त्याचदरम्यान त्यांनी त्यांच्या भावाच मित्र असलेले अजय भोसले यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी अजय भोसले यांनी पुढे येऊन सर्व कहाणी कथन केली होती.

त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आणि अग्रवाल कुटुंबाविरोधात काही तक्रार असेल तर ते सांगण्याचे आवाहन लोकांना केले होते.