पुण्यातल नामवंत बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने गेल्या आठवड्यात दारूच्या नशेत कार चालवत बाईकला धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला. “हिट अँड रन”च हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलेले असून सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. या गुन्ह्यातील रोज नवनवे अपडेट समोर येत असून मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी संपूर्ण सिस्टीमच क्रॅक केल्याचेही उघड झाले आहे. . पोलीस, डॉक्टर…सर्वांना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला, ब्लड रिपोर्टही बदलण्यात आले. या प्रकरणावरून पुण्यातील वातावरण आता चांगलंच तापलं आहे. आता याचसंदर्भात एक नवे अपडेट समोर आले आहे. सर्वांनाच हादरवणारा कल्याणीनगरचा ‘तो’ अपघात पुन्हा घडणार आहे.
वाचून दचकलात ना? पण हे खरं आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. या अपघातातील दोषींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ द्वारे अपघाताची ती दुर्दैवी घटना जिवंत करण्यात येणार असून डिजिटल पुराव्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आणि यासाठी ‘एआय’ मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आता यातून नेमकं काय निष्पन्न होतं, काय नवी माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल.
याप्रकरणातील गुंतागुंत आता चांगलीच वाढू लागली आहे. विशेष म्हणजे या अपघातास जबाबादार ठरलेला अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल , या तीन पिढ्या एकाच वेळी तुरूंगात असून ते चांगलेच अडकल्याचे दिसत आहे. पुणे गुन्हे शाखेने अखेर सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आरोप आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणीही त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली.
पोलिसांनी कर्मचाऱ्यांना विचारले सवाल
कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन केसमध्ये पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील ड्रायव्हरला अटक केली आहे. या ड्रायव्हरचा कबुली जबाब नोंदवून घेतला आहे. अग्रवाल पिता-पुत्रांनी ड्रायव्हरला दोन दिवस घरात कोंडून ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने ड्रायव्हरला अग्रवाल यांच्या घरी नेऊन क्राईम सीन क्रिएट केला होता. गुन्हे शाखेने घरात उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टरही तपासले. घरातील कर्मचाऱ्यांना काही प्रश्नही विचारले.
कोणते प्रश्न विचारले?
1- गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत, ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले?
2- त्यावेळी घरात कोण कोण होते?
3- तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवले?
4 अग्रवाल यांच्या बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का?
घरातील नोकरांना हे प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या ऊर्वरीत वाहनांची माहितीही मागवली आहे. आता या प्रकरणात ड्रायव्हर गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पार्वती पुजारी असं गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचं नाव आहे. गंगारामला खरोखरच डांबून ठेवलं होतं का? कोणी डांबून ठेवलं होतं? गंगाराम घरातून कधी बाहेर पडला. किती दिवसानंतर आला? त्याला काही अमिष दाखवलं गेलं होतं का? आदी प्रश्न पोलिसांकडून पार्वती यांना विचारले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे.