Pune Porsche Accident : गाडी कधी कोणी चालवली? अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर ? पोलीस आयुक्तांनी केलं उघड

| Updated on: May 24, 2024 | 1:21 PM

हा अपघात घडला तेव्हा तो अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हरच गाडी चालवत होता असा दावा त्याच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी केला आहे. कारमधील त्याच्या मित्रांनाही याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीच या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे.

Pune Porsche Accident : गाडी कधी कोणी चालवली? अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर ? पोलीस आयुक्तांनी केलं उघड
pune case police
Follow us on

पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापलं आहे. एका धनिकाच्या अल्पवयीन मुलाने लायसन्स नसताना आणि दारूच्या नशेत असतानाही ही कार भरधाव वेगाने चालवून बाईकला धडक दिली, ज्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागलाय. आठवड्याभरापासून चालू असलेल्या या केसमध्ये रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता तर नव्या दाव्याने खळबळच माजली आहे. हा अपघात घडला तेव्हा तो अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हरच गाडी चालवत होता असा दावा त्याच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी केला आहे. कारमधील त्याच्या मित्रांनाही याला दुजोरा दिला आहे. मुलाला वाचवण्यासाठी हा दावा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे. अल्पवयीन आरोपी हाच गाडी चालवत होता. घरातून निघताना पोर्शे गाडी घेऊन अल्पवयीन आरोपीच निघाला असंही रेकॉर्ड आहे, सीसीटीव्ही फुटेजही आहे, असे स्पष्ट करत ड्रायव्हरची थिअरी त्यांनी फेटाळून लावली आहे.

या घटनेवरून सध्या बराच गदारोळ माजला आहे. या दुर्घटनेनंतर आरोपीला थोड्याच वेळात जामीन मिळाला होता, मात्र लोकांचा रोष वाढला. त्यानंतर त्याला बुधवारी बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तसेच याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

मात्र या प्रकरणावरून राजकारण्यांनीही संताप व्यक्त केला असून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हेदेखील या घटनेवरून आक्रमक झाले होते. या अपघात प्रकरणात राजकीय दबावापासून पोलिसांच्या तपासासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या केसमध्ये कोणताही दबाव आला किंवा दिरंगाई झाली असं म्हणणं योग्य नसल्याचे सांगत त्यांनी धगेंकराच्या आरोपांवर उत्तर दिलं.

काय म्हणाले पोलीस आयुक्त ?

पहाटे २:३० च्या सुमारास अपघात घडल्यानंतर सकाळी ८ वाजता गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास ३०४ कलम वाढवण्यात आलं होत. या कलमाची गरज वाटतं होती म्हणून आम्ही ते कलम वाढवलं. त्याच दिवशी बाल न्याय मंडळाकडे अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून ग्राह्य धरावं अशी आमची मागणी होती तसा अर्ज केलेला होता. ही मागणी कोर्टाने मान्य केली नव्हती. आम्ही त्याला चॅलेंज केलं. आणि नंतर आमची मागणी मान्य करून अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात ठेवलय. प्रौढ म्हणून ग्राह्य धरण्याची जी मागणी होती त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

याच प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि इतरांना अटक केलेली आहे. दोन्ही गुन्हे आम्ही अत्यंत पारदर्शकपणे हाताळत आहोत. पुरावे गोळा करुन ही केस आरोपीविरोधात कशी मजबूत करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. पहिल्या दिवशी काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता का ? काही अनियमितता झाली का याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे. दोन्ही गोष्टींचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून आम्ही कोर्टात हा खटला चालवला जावा याकडे लक्ष देत आहोत. पोलिसांनी काही दिरंगाई केली किंवा आणखी काही तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, त्याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कायदेशीर कारवाई योग्य रित्या केलेली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीत आरोपीला सुविधा पुरवण्यात आल्या यात काहीही तथ्य आढळून आलेलं नाही.

ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला पण..

ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच कलम लावण्यात येत आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

 

ब्लड रिपोर्ट अद्याप आलेला नाही

या केसचा ब्लड रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. दोन वेळा ब्लड सॅम्पल घेतलेले आहेत. ते खबरदारी म्हणून घेण्यात आले आहेत. आरोपी पूर्णपणे शुद्धित नव्हता अस या प्रकरणात नाही. आरोपी शुध्दीत होता आणि त्याच्याकडून अपघात होऊन दोघांचा जीव गेला याची कल्पना त्याला होती.