Pune Porsche Accident : अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला ? ती व्यक्ती कोण ? अखेर पडदा उठणार

| Updated on: Jun 03, 2024 | 11:46 AM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला पोलिसांनी शनिवारी अखेर अटक केली. अपघातानंतर अलपवयीन मुलाला चाचणीसाठी ससून मध्ये नेले तेव्हा त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले.ते रक्त शिवानी अग्रवाल यांचे होते असा अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले? अग्रवाल पती-पत्नी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला?

Pune Porsche Accident : अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला ? ती व्यक्ती कोण ? अखेर पडदा उठणार
Follow us on

पुण्यातील कल्याणीनंगर येथील अपघातातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चालली असून रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. या अपघातास जबाबदार असलेला अल्पवयीन आरोपी याच्या अटकेनंतर त्याचे वडली, आजोबा आणि आता त्याची आई शिवानी अग्रवाल अशी एकामागोमाग एक कुटुंबातील सदस्यांना अटक झाली आहे. आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्याची आई शिवानी अग्रवाल यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिवानी आणइ विशाल अग्रवाल या दोघांना ५ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

याप्रकरणाचा तपास आता आणखी सखोल होत आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे समोर आले.

विशाल अग्रवाल याने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोर यांना दिले, ती व्यक्ती नेमकी कोण याचा तपास करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

विशाल अग्रवाल यांच्यावर एकूण तीन गुन्हे

याप्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल हेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास परवानगी दिली. तसेच अपघात झाल्यानंतर त्याचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब याच्यावर दबाव टाकत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. आणि अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केला, असे तीन गुन्हे विशाल याच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस करणार या मुद्यांचा तपास

– विशाल व शिवानी अग्रवाल यांनी डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांच्याशी कशा प्रकारे आर्थिक व्यवहार केला?

– अग्रवालने कोणाच्या मदतीने अतुल घटकांबळे याला तीन लाख रुपये दिले ?

– अग्रवाल पती-पत्नी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला?

– डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरीज आणि मुळ रक्ताचा नमुना अग्रवाल पती-पत्नीकडे दिला काय ?

– फरार असताना शिवानी अग्रवाल कुठे होत्या?

– रक्ताचे नमुने घेताना तेथे कोण-कोण उपस्थित होते?

– अग्रवाल यांच्या बंगल्याची झडती होणार

अशा अनेक मुद्यांची पोलिस तपासणी करणार असू त्या अनुषंगाने अग्रवाल पती-पत्नीला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

काय आहे पुणे कार अपघात प्रकरण ?

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी विधिसंघर्षग्रस्त बालक चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत.