पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून दोघांचा जीव घेणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाला सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर मध्यप्रदेशातील दोघांचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली मात्र काही तासांतच त्याची जामीनावर सुटका झाली. त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला. अखेर बुधवारी त्याला बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचा निर्णय दिला. आरोपी हा अल्पवयीन आहे. मात्र त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. त्यासंदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे, तोपर्यंत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पिझ्झाचे चोचले बंद
दरम्यान या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा-बर्गर देण्यात आला होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर एकच गदारोळ माजला. दोघांची हत्या करणाऱ्या या अल्पवयीन आरोपीला एवढ्या सुविधा का, असा सवालही विचारण्यात आला. मात्र आता हाच अल्पवयीन आरोपी सध्या बालसुधारगृहात असून तेथे त्याचे पिझ्झा-बर्गरचे चोचले बंद झाले आहेत. काल त्याचा बालसुधार गृहातील पहिला दिवस होता, तेव्हा त्याला तेथीलच दिनक्रम पाळावा लागला.
रिपोर्ट्सनुसार, अल्पवयीन आरोपीला पहिल्या दिवशी इतरांप्रमाणेच वागवण्यात आले.सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, दूध आणि अंडी दिली तर दुपारी जेवणासाठी पोळी-भाजी देण्यात आली. त्यानंतर प्रार्थना, समुपदेशन करण्यात आले. दुपारी आणि रात्रीसाठी त्याला इतरांप्रमाणेच अगदी साधे जेवण देण्यात आले. या आरोपीला घरून आलेले कोणतेही खाद्यपदार्थ देण्यास मनाई करण्यात आली आहे. बालसुधारगहातील इतर लोकांप्रमाणेच त्याला अतिशय साध्या पद्धतीने रहावे लागणार असून जमीनीवर साध्या अंथरुणावर झोपावे लागणार आहे. पिझ्झा-बर्गरवर ताव मारणाऱ्या या धनिकपुत्राला पुढील दोन आठवडे बालसुधारगृहातील नाश्ता आणि जेवणावरच भागवावे लागणार असल्याचं चित्र दिसतंय.
आरोपीवर प्रौढ म्हणून खटला कधी चालणार?
कायद्यानुसार, आरोपी प्रौढ आहे का, हे सिद्ध करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या केल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जातो. त्या चाचण्या करण्यासाठी कोर्टाला काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे आजच प्रौढ म्हणून कोणताही निकाल देता येणार नाही, अशी भूमिका बाल हक्क न्यायालयाने घेतली आणि आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला.
विशाल अग्रवालची कोठडी वाढवून मागणार
दरम्यान अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हेदेखील सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. विशाल अग्रवालची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी पोलिस कोर्टाकडे करणार आहेत.
या कार अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांना विशाल अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबियांची आणखी चौकशी करायची आहे. त्यामुळे विशआल अग्रवालची पोलिस कोठडी वाढवून मिळावी अशी वविनंती पोलीस न्यायालयात करतील. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस वेगवेगळ्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे पोलिस आता ड्रग्सच्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अंमली पदार्थांचे सेवन केले होते का ?
ज्या दिवशी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली, तेव्हा अंमली पदार्थांचेही सेवन करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन आरोपीचे आजोबा, सुरेंद्र अग्रवाल त्यांनाही काल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. छोटा राजनशी असलेल्या कनेक्शनबाबत सुरेंद्र यांचा काय संबंध आहे, हे तपासण्यासाठी काल सुरेंद्रकुमार यांची चौकशी केली.
ज्या पोर्शे कारमुळे हा अपघात झाला त्या कारची फॉरेन्सिक तपासणीदेखील पोलिसांनी केली आहे. दोन दिवस केलेल्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस आज कोर्टात काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.