अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली अशी कबुली विशाल अग्रवाल याने पोलिसांसमोर दिली आहे. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी त्या मुलाला अटक करण्यात आली तर घटनेनंतर फरार झालेल्या त्या मुलाचे वडील, अर्थात विशाल अग्रवाल यांना मंगळवारी छ. संभाजीनगर येथून अटक केली.
काल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल यांनी चुकीची कबुली दिली. अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चुकीच असल्याचं कबूल करत झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल यानेही खंतही व्यक्त केली.
तीन दिवसांची कोठडी ठोठावली
पोलिसांनी काल विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात हजर केले असता विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशाल अग्रवाल यांच्यसह बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
“वेदांतला त्याचे वडील विशांत अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती. विशालने वेदांतला परवाना नसताना गाडी चालवायला दिली”, असं पोलिसांनी युक्तिवादात म्हटलं. “जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता. मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला सापडला”, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. “गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. मोबाईलचा तपास करुन जप्त करायचा आहे. त्यामुळे विशालची सात दिवसांची कोठडी देण्यात यावी”, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. तसेच “पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. महागड्या गाडीची अजून नोंद नाही”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी
तर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला. बाल हक्क न्यायालयाच्या या निर्णयानंतर या आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव बाल सुधारणगृहात म्हणजेच बाल निरीक्षणगृह येथे ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी काल सुनावणी पार पडली तेव्हा पोलिसांनी अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद केला. आरोपी अल्पवयीन असला तरी तो नशेच्या आहारी गेला आहे. त्यामुळे त्याच्यापासून इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळे बाल हक्क न्यायालयाने आरोपीला निरीक्षणगृहात ठेवण्याचा निकाल दिला.