पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघात प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि त्या कारमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांच्या दाव्यानुसार, अपघातावेळी ती कार आरोपी मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता. मीच ती कार चालवत होतो, असे ड्रायव्हरनेही पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले आहे. या नव्या दाव्यामुळे मात्र एकच खळबळ माजली आहे. धनिकपुत्राला वाचवण्यासाठी हा दावा करण्यात येत आहे का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान आरोपीचे वडील विशाल अग्रवाल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आहे.
मुलगा नव्हे ड्रायव्हर चालवत होता कार
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे दुर्घटननेप्रकरणी विशाल अग्रवालची सध्या चौकशी सुरू आहे. दुर्घटनेच्या वेळेसे त्याचा फॅमिली ड्रायव्हर हा कार चालवत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांनीही हाच जबाब दिला आहे. आता या प्रकरणात नवे अपडेट आले आहेत की ज्या फॅमिली ड्रायव्हरने कार चालवल्याचे सांगितले जात होते, त्याची पोलिसांनी गुरूवारी (23 मे) पुन्हा चौकशी केली.
या फॅमिली ड्रायव्हरने आधीच्या जबाबात असा दावा केला होचा की दुर्घटना घडली तेव्हा तोच कार चालवत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान देखील या ड्रायव्हरने हीच गोष्ट कबूल केली आहे. तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनीही असाच दावा केला की त्यांनी नियुक्त केलेला ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत होता.
RTO ची मोठी कारवाई
अपघाताआधी ही कार ज्या रस्त्यावरून गेली त्या संपूर्ण रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केलं आहे. कार नेमकं कोण चालवत होतं हे जाणून घेण्यासाठी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र ज्या-ज्या पबमध्ये गेले होते, तेथील सीसीटीव्हीदेखील पोलिसांकडून चेक करण्यात येत आहेत. दरम्यान RTOने याप्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे. तो अल्पवयीन मुलगा जोपर्यंत 25वर्षांचा होत नाही, तोपर्यंत त्याला लायसन्स जारी करण्यात येणार नाही. तसेच अपघातग्रस्त पोर्शे गाडीचे रजिस्ट्रेशन हे 12महिन्यांसाठी रद्द करण्यात आले आहे. .
अंमली पदार्थांचे केले सेवन ?
ज्या दिवशी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली, तेव्हा अंमली पदार्थांचेही सेवन करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन आरोपीचे आजोबा, सुरेंद्र अग्रवाल त्यांनाही काल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. छोटा राजनशी असलेल्या कनेक्शनबाबत सुरेंद्र यांचा काय संबंध आहे, हे तपासण्यासाठी काल सुरेंद्रकुमार यांची चौकशी केली. ज्या पोर्शे कारमुळे हा अपघात झाला त्या कारची फॉरेन्सिक तपासणीदेखील पोलिसांनी केली आहे. दोन दिवस केलेल्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस आज कोर्टात काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.