पिटबुल कुत्र्याच्या (Pitbull Attack) हल्ल्यात माणूस ठार झाल्याच्या घटना गेल्या काही अनेकदा समोर आल्यात. भारतात पिटबुलची दहशत वाढतेय. पिसाळलेल्या पिटबुलची (Dog Attack News) एक थरकाप उडवणारी घटना आता पंजाबमधून समोर आलीय. पंजाबच्या (Punjab Pitbull News) गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर परिसरात एका पिसाळलेल्या पिटबुलने तब्बल 12 जणांवर जीवघेणा हल्ला केला. एकामागून एक 12 जणांवर हल्ला करत पळत सुटलेल्या या पिटबुलला अखेर ठार मारण्यात आलं. 5 गावांमध्ये या पिटबुलने धुडगूस घातला होता. रात्री उशिरा झालेल्या पिटबुलच्या हल्ल्याने अख्ख्या गावाची झोप उडवली होती.
पिसाळलेला पिटबुल नॅशनल हायवे क्रॉस करुन 15 किलोमीटर अंतर पार करत गावात शिरला. तंगोशाह या गावातून आलेला पिसाळलेला पिटबुल चोहाना गावापर्यंत पोहोचला. या 2 गावांचं अंतर 15 किमी आहे.
15 किलोमीटरच्या या प्रवासात त्याने वाटेत दोघा मजुरांना घायाळ केलं. पण त्यांनी पिटबुलच्या गळ्यातली सळी असलेला पट्टा पकडला आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने सळी सुटली आणि पिटबुल पुन्हा पळत सुटला. रात्री दुसऱ्या एका गावात तो पोहोचला.
एका घरात असलेल्या 60 वर्षांच्या दिलीप कुमार या व्यक्तीला गंभीररीत्या पिटबुलने हल्ल्यात जखमी केलं. दिलीप यांनी हिंमत करुन कुत्र्याच्या तोंडात गळ्यापर्यंत हात टाकला आणि त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं दिलीप यांच्या घरात असलेला दुसरी एक पाळलेली कुत्री दिलीप यांना वाचवण्यासाठी पिटबुलवर चाल करुन गेली.
त्यानंतर पिटबुलने पाळलेल्या कुत्रीवर हल्ला केला. या झटापटीत दिलीप यांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने पळ काढला. पण पिटबुल कुत्रीला सोडून पुन्हा दिलीप यांचा पाठलाग करत सुटला.
जीव मुठीत घेऊन धावणाऱ्या दिलीप यांच्यावर पिटबुलने झेप घेतली. त्यांनी रस्त्यातच पाडलं आणि त्याच्यावर हल्ला करत सुटला.आपल्या धारदार दातांनी एकामागून एक पिटबुल दिलीप यांच्यावर वार करत सुटला होता.
रस्त्यातच झालेल्या या हल्लावेळी गावातले लोकही जमले. पण कुणाचीही मध्ये पडून पिटबुलला रोखण्याची हिंमत झाली नाही. दरम्यान, दिलीप यांच्या भावाच्या नातलगांनी त्यांना घरात ओढलं आणि गेट लावून घेतला. त्यामुळे ते पिटबुलच्या तावडीतून सुचले. तोपर्यंत अख्खा रस्ता रक्ताने माखला गेला होता.
दिलीप यांच्यानंतर पिटबुलने त्याच गावातील बलदेव राज नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. यात बलदेव यांच्या पायाला जबर जखम झाली. तिथून ते घरोटा रोडच्या दिशेने पळाला. वाटेत येणाऱ्या अनेक प्राण्यांना चावत सुटला.
पुढे एके ठिकाणी असलेल्या नेपाळी वॉचमनलाही पिटबुलने लक्ष्य केलं. पण रस्त्यावर असलेल्या दोन कुत्र्यांनी नेपाळी वॉचमन रामनाथला वाचवलं. तिथून पुन्हा पुढे पिटबुल पळत गेला आणि छन्नी गावात पोहोचला.
छन्नी गावात एके ठिकाणी मंगल सिंह नावाचा माणूस झोपला होता. त्याला पिटबुलने आपल्या जबड्यात पकडलं. मंगल सिंह यांनी घायाळ करुन पिटबुल पुन्हा पुढे पळाला.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पिटबुलने मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यावर हल्लाबोल केला. यात काहीजण जखमी झाले. एकूण 12 जण या हल्ल्यात जखमी झाले.
पळता पळता पिटबुल चौहाना गावात पोहोचला आणि शेतात फिरत असलेल्या निवृत्त कॅप्टन शक्ती सिंह यांच्यावर पिटबुलने हल्ला केला. पण शक्ती सिंह यांनी हिम्मत केली आणि हातातली काठी पिटबुलच्या तोंडात घातली. त्यानंतर त्याचे दोन्ही कान हातांनी ओढले.
यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे गावातले इतर लोकही निवृत्त कॅप्टनच्या दिशेने मदतीसाठी धावले. सगळ्यांनी मिळून कॅप्टनला मदत केली. धुडगूस घालणाऱ्या पिटबुलला संपातलेल्या गावकऱ्यांनी अखेर लाठ्या काठ्यांनी इतकं बदडलं की तो ठार मेलाच.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये या घटनेनं खळबळ माजलीय. पिटबुल जातीच्या कुत्र्यांना केलेलं हे भयंकर कृत्य कळल्यानंतर सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडालाय.