रायगड : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी जयदीप घासे, सुमीत बागकर आणि कौस्तुभ गिजम या तिघांना अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर्स, लॅपटॉप, शाई, कागद तसेच शंभर, दोनशे आणि पाचशे अशा दराच्या एकाच बाजूने छापलेल्या 49 हजार 900 रुपयांच्या खोट्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. काही आरोपींनी एका कांदा व्यापाऱ्याला बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झालं.
अलिबागमध्ये दोन दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्याला एका ग्राहकाने फसवलं होतं. संबंधित ग्राहकाने कांदे व्यापाऱ्याला 100 रुपयांच्या तब्बल 22 बनावट नोटा दिल्या होत्या. ग्राहक निघून गेल्यानंतर व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली होती. त्यानंतर कांदा व्यापाऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची शाहनिशा केली.
कांदा व्यापाऱ्याने नेमकं कुणाकडून त्या नोटा घेतल्या याची माहिती मिळवली. या प्रकरणाचा तपास करत असताना यामागे मोठी टोळी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत त्यांच्या छापखान्यावर छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. तसेच मोठा मुद्देमाल, छपाई मशीनसह शाई वगैरे जप्त केले. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात भिवंडीतही बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं होतं. भिवंडीतील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता शहरातून बनावट नोटा छापणारी टोळीच जेरबंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील एक तरुण कॉम्युटर सायन्सचा पदवीधर आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्याला बनावट नोटा छापण्याची आयडिया सूचली होती. त्यानंतर काही जणांना एकत्र करून या गँगने नोटा छापण्याचा धडाका लावला होता. अखेर शांतीनगर पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना साईबाबा मंदिर कल्याण रोड या परिसरात एक इसम बनावट नोटा एका व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कल्याण रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात सापळा रचला आणि अहमद नाजम नाशिककर (वय 32) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याचे साथीदार मोहम्मद शफीक अश्फाक अहमद अन्सारी (वय 35) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय 41) यांना अटक केली.
पोलिसांनी या दोघांकडूनही 1 लाख 19 हजार 500 किंमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रिंटिंगचे कागद, अर्धवट प्रिंट केलेल्या रु 500 व 100 च्या नोटा असा एकूण 2 लाख 70 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा :
सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान अखेर अटकेत, इतर 8 जणांवरही कारवाई, आता पर्याय काय?
तरुणीला प्रेम केल्याची इतकी मोठी शिक्षा, कुटुंबियांकडून निर्घृण हत्या, हॉरर किलिंगची भयानक घटना