रायगड : उरणमधील समुद्र किनारी (Uran Beach) स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याची घटना ताजी असतानाच रायगडमध्येही (Raigad Crime) असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. माणकेश्वर बीचवर (Manakeshwar) स्फोटक सदृश्य वस्तू सापडली आहे. दहा ते बारा स्फोटक कांड्या सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर मोरा पोलीस, एसीपी कार्यालय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माणकेश्वर समुद्र किनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये माणकेश्वर बीचवर स्फोटक सदृश्य वस्तू आढळली आहे. माणकेश्वर किनारी या वस्तू सापडल्या आहेत. दहा ते बारा स्फोटक कांड्या सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून मोरा पोलीस, एसीपी कार्यालयातील कर्मचारीही माणकेश्वर बीचवर दाखल झाले आहेत. त्यामुळे तूर्तास माणकेश्वर समुद्र किनारी पर्यटक-ग्रामस्थांसह कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
याआधी, नऊ मे (सोमवारी) रात्री गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत स्फोटकांची बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. जिलेटिनच्या 54 कांड्या असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली होती.