सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 1 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांत मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. लोकलप्रवासादरम्यानही अनेक गुन्हे होत असतात. पाकिटमारी, चोरी, खिसे कापणाऱ्यांचा सुळसुळाट असतो. महिलांच्या डब्यातही चेन स्नॅचिंग, चोरीचे गुन्हे घडत असतात. काही दिवसांपूर्वीच कळवा आणि बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरांनी पळ काढल्याची घटना घडली होती. अखेर पोलिसांनी त्या चोरांचा छडा लावत त्यांना अटक केली आहे.
कल्याण ते कळवा व भाईंदर ते चर्चगेट दरम्यान वारंवार घटना घडत असल्याने लोहमार्ग मुंबई गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील ठाणे युनिट क्र. ०२, गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याना ठोकल्या बेड्या ठोकल्या. तसेच दोन गुन्हे उघडकीस आणून लाखोंचा मुद्देमाल ही जप्त केला. रोहीत विजयबहादुर यादव, रामजग उर्फ जग्गु यादव आणि विवेक यादव असे या आरोपीची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख 20 हजार रुपयांचा मला जप्त केला. त्यानी अजून किती ठिकाणी अशी चोरी केली याचाही पोलिस तपास करत आहेत.
लोकल प्रवासात वाढले गुन्हे
कळवा व बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी धावत्या लोकलमधून खाली उडी मारून पळ काढला. याप्रकरणी ठाणे व बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करून गुन्हे उघडकिस आणण्याकरीता डॉ. श्री. रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांनी गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई यांना आदेश दिला होता.
त्यानुसार, गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई चे ठाणे युनिट क्र. ०२ चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या तपासादरम्यान तपास पथकाने कळवा ते दादर रेल्वे स्टेशन व बांद्रा रेल्वे स्टेशन येथील सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता दोन्ही गुन्हे समान आरोपींनी केले असल्याचे निदर्शनास आले.खबऱ्यांतर्फे त्यांची माहिती काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, पण माहिती मिळाली नाही.
परराज्यातील आरोपींचा असा लावला शोध
अखेर हे आरोपी परराज्यातील असावेत असा संशय तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर तपास पथकाने कळवा रेल्वे स्टेशन येथील गुन्ह्याच्या घटनास्थळाचा डम्प डाटा घेऊन तांत्रिक विश्लेषण करून तपास केला. तेव्हा एक आरोपी अमन विनोद खरवार, ( वय १९ वर्षे, रा.वाराणसी, उत्तर प्रदेश) याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मंगळसूत्र, आणि सोन्याची चेन असा लाखोंचा मला जप्त केला.