जयपूर | 2 सप्टेंबर 2023 : देशभरात गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून राजस्थानमध्ये मानवतेला काळिमा (crime) फासणारा एक प्रकार घडला आहे. गर्भवती महिलेला निर्वस्त्र करून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली असून यानंतर विरोधकांनी गहलोत सरकावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे नेते सतीश पुनिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून उत्तर मागितले आहे. दरम्यान महिलेसोबत हे हीन कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून, तिचाच पती आहे. पोलिसांनी आरोपी पती काना मीना याला ताब्यात घेतले आहे.
विरोधकांनी गहलोत सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यासंदर्भात सोशल मीडयावर पोस्टही टाकण्यात आली आहे. ‘ प्रतापगड येथे आदिवासी महिलेसोबत झालेले गैरवर्तन पाहून काळजाचा थरकाप उडाला आहे. गुन्हेगारांचे मनोधैर्य इतके उंचावले आहे की ते खुलेआम अशा गुन्ह्यांचे व्हिडिओही बनवत आहेत. हा गैरव्यवहार म्हणजे समाजाचा आणि लोकशाही मूल्यांचा पराभव आहे. या गुन्हेगारांना इतकी कठोर शिक्षा द्यावी की यापुढे ते असा गुन्हा करणेच काय त्याचा मनातही विचार आणणार नाहीत’ अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
ती रडत होती…
प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात २१ वर्षीय महिलेला विवस्त्र केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे गरोदर महिलेला विवस्त्र करून गावभर फिरवण्यात आले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दुर्दैवी महिला, रडत विव्हळत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेचा पती आणि कुटुंबीयांनीच तिला विवस्त्र करून मारहाण केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चार दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती
रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड शहरातील पहाडा गावात घडला. हा व्हिडीओ तीन-चार दिवसांपूर्वीचा आहे. पीडत महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचे दुसऱ्या तरूणावर प्रेम होते. आणि ती गर्भवतीदेखील आहे. चार-पाच दिवसांपूर्वी पीडित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र तिच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी तिचा पाठलाग करून तिला पकडले आणि गावी आणले. महिलेचा पती आणि कुटुंबिय संतापले होते, रागाच्या भरात त्यांनी हे हीन कृत्य केले. पतीने त्याच्या पत्नीला निर्वस्त्र केले. आणि तशाच अवस्थेत तिला मारहाण करत गावभर फिरवले. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये पतीच्या आई-वडिलांचाही समावेश होता.