राजस्थान : लहान भावाच्या लग्नानंतर एका गंभीर गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याच्या मोठ्या भावाला अटक केलीय. ही घटना जयपूर (Jaipur Crime News) येथील मुरलीपुरा इथं घडलीय. एका महिलेवर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. यात महिला गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, हा गोळीबार या महिलेच्या पतीच्या मोठ्या भावानेच घडवून आणला असल्याचं उघडकीस आलाय. पोलिसांच्या (Jaipur Police) तपासातून ही माहिती समोर आलीय.
अटक करण्यात आलेली आरोपीचं नाव अब्दुल अजीज आहे. तर लग्न केलेल्या त्याच्या लहान भावाचं नाव अब्दुल लतीफ आहे. अब्दुल लतीफ याने अंजली नावाच्या एका हिंदू मुलीसोबत लग्न केलं होतं. या लग्नाला अब्दुल अजीज याचा विरोध होते. पण हा विरोध न जुमानता अब्दुल लतीफ याने लग्न केलं होतं. त्याचा राग मनात ठेवून अब्दुल अजीज याने आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गोळीबार घडवून आणला होता.
अब्दुल अजीज हा एका कारखान्यात काम करतो. याच कारखान्यात त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलीम आणि आबिद यांच्या मदतीने त्याने अंजलीवर गोळीबार घडवून आणला होता. एक दिवस अंजली आणि तिचा पती कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अब्दुल अजीज आणि त्याच्या साथीदारांनी स्कुटीवरुन येत अंजलीवर बेछूट गोळीबार केला होता.
या गोळीबारात अंजली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. आता या संपूर्ण प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय.