जयपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) महिला औषध निरीक्षकाला लाच (Lady Drugs Inspector Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ड्रग्ज इन्स्पेक्टर सिंधू कुमारी (Sindhu Kumari) जाळ्यात सापडली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम माझ्या एकटीसाठी नाही, मला वरपर्यंत पैसा द्यावा लागतो, नाही दिल्यास बिकानेरला बदली होईल, असं तिने अटकेनंतर निर्लज्जपणे सांगितलं. अटक करण्यात आलेल्या सिंधू कुमारीवर जयपूरमधील 500 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्याची जबाबदारी होती. ती प्रत्येक दुकानातून दरमहा पाच हजार रुपये वसूल करत असे. दहा दिवसांपूर्वी एका औषध दुकान मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती की, अनेक वर्षांपासून सिंधू कुमारी आपल्याकडून महिन्याला पाच-पाच हजार रुपये उकळत आहे.
“आजपर्यंत कधीही कुठले औषधाचे दुकान तपासले नाही, त्यांची फक्त घरी येऊन पैसे देण्याची मागणी असायची. छोटी-छोटी कामं करायची असली, तरी प्रत्येक कामासाठी ती पैसे मागायची. औषध दुकानात नवीन कर्मचारी ठेवायचा असेल तरी त्या बदल्यात ती पैसे मागायची, कारण नियमानुसार राज्य निरीक्षकांना याची माहिती द्यावी लागते” असं एका औषध दुकानदाराने सांगितलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची सलग सात दिवस चौकशी केली आणि ती खरी असल्याचे आढळून आले, त्यानंतर 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिंधू कुमारीचा माग काढण्यासाठी सापळा रचण्यात आला.
एसीबीने आरोपी महिलेला पैसे गोळा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये बोलावले आणि तिथे तिला रंगेहाथ पकडले. सिंधू कुमारी मूळची बिहारची असून जयपूरमध्ये कार्यरत आहे.
ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी लाच घेत असताना वैद्यकीय विभागात बैठक सुरू होती. तिला बोलावले जात होते मात्र ती लाच घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. सिंधू कुमारीचा औषध विभागात फार दरारा होता. जयपूरच्या सर्वात मोठ्या वैद्यकीय व्यवसायाची बाजारपेठ सेठी कॉलनीची जबाबदारीही तिच्याकडे होती.
इन्स्पेक्टर असूनही गाडी, ड्रायव्हर अशा सुविधा तिला देण्यात आल्या होत्या. मागच्या वेळी जेव्हा कोरोनामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होता, तेव्हाही औषध विभागाने त्याची संपूर्ण जबाबदारी ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारीकडे दिली होती. आता सिंधू कुमारीने केलेल्या आरोपांनी औषध विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
संबंधित बातम्या :
नाशकात ITI चे सहसंचालक 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त
परिवहन अधिकाऱ्याकडे 50 हजारांच्या खंडणीचा तगादा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी
Bribe | दहा लाखांची मागणी, सात लाखात तडजोड, लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा