जयपूर | 18 सप्टेंबर 2023 : वर्षभरापूर्वी झालेल्या एका ब्लाईंड मर्डर केसचा खुलासा करण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे. राजस्थानच्या गावात एका महिलेची हत्या (crime news) झाली होती. मात्र कसून तपास करूनही वर्षभरात पोलिसांना आरोपी सापडले नव्हते. मात्र त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून त्या महिलेचा मारेकरी सापडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या महिलेची हत्या बाहेरच्या कोणी व्यक्तीने नव्हे तर तिच्या घरातील सदस्याने, तिच्या पोटच्या मुलानेच केली होती. राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील हिंडौन सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरगामा गावात ही हत्या झाली होती. अखेर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक (accused arrested) केली आहे.
रागाच्या भरात मुलानेच त्याच्या आईचा खून केला होता. मात्र त्यानंतर त्याने स्वत: पोलिसांत जाऊन अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येची तक्रार नोंदवली होती. चक्क वर्षभर तो मुलगा पोलिसांना फसवत राहिला. मात्र अखेर तो पकडला गेलाच.
हिंडौन सदर पोलिस स्टेशनचे अधिकारी रामचंद्र रावत यांनी सांगितले की, बरगमा गावात 7 सप्टेंबर 2022 रोजी रात्री ६० वर्षांच्या या महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची गंभीर स्थिती पाहून तिला प्राथमिक उपचारानंतर जयपूरला रेफर करण्यात आले. जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात उपचारादरम्यान 12 सप्टेंबर रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला.
मुलाने अज्ञात हल्लेखोरांविरोधात नोंदवली तक्रार
त्या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा लेखराज जाटव याने १३ सप्टेंबर रोजी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ” हल्ला झाला त्या रात्री आई खालच्या खोलीत झोपली होती आणि मी वरच्या खोलीत होतो. मध्यरात्रीच्या सुमारास मला किंचाळण्याचा आवाज आला असता, मी खाली धाव घेतली तर काय ? माझी आई जमिनीवर पडली होती आणि तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. गंभीर जखमी झालेली आई रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. मी तिला लगेच रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचारांनंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला”, असे मुलाने पोलिसांना सांगितले.
रागाच्या भरात आईला केली मारहाण
मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर फिर्यादी लेखराज हा फरार झाला. याप्रकरणी सर्व पैलूंचा कसून, बारकाईने तपास केल्यानंतर पोलिस अखेर त्या महिलेच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले. या प्रकरणाच्या लिंक्स जोडल्यानंतर पोलिसांना त्या महिलेच्या मुलावरच संशय आला. अखेर खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी लेखराज याला सिकरुडा रेल्वे फाटकाजवळून ताब्यात घेतले. आणि त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच लेखराज याने त्याचा गुन्हा स्वीकारत आपणच आईला मारल्याचेही कबूल केले. रागाच्या भरात तिला मारहाण केली व त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. मात्र वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.