पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडलं आहे. मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आलं आहे. कारण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रामदास मारणे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 5 जानेवारी 2024 ला दिवसाढवळ्या झालेल्या शरद मोहोळ याच्या हत्येने पुणे हादरून गेलं होतं. पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपींना पकडलं खरं पण या हत्येमागचे खरा मास्टरमाईंड वेगळा कोणतरी असावा असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी अखेर या आरोपीला पकडलं असून आता रामदास उर्फ वाघ्या मारणे याने मोहोळला का संपवलं? पोलीस याबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्य आरोपी रामदास मारणेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. रामदास मारणे याच्यासोबत विठ्ठल शेलार हे नावसुद्धा समोर आलं आहे. पनवेल येथील वाशीत एका फार्म हाऊसवर गुन्हा शाखेने पनवेल पोलिसांनी मदत घेत अटक केली आहे. यामधील तीन जण हे आरोपी आहेत. तर तीन जण संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी आरोपींना पुणे पोलिसांकडे सोपवलं आहे. रामदास मारणे नेमका कोण? याचा मारणे टोळीशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
पोलीस तपासामध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळ्या घालणारा आरोपी मन्ना पोळेकर याचे एक रेकॉर्डिंग समोर आलं होतं. ज्यावेळी पोळेकर कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होता त्यावेळी त्याने एका नातेवाईकाकडून सिम कार्ड घेतलं होतं. या सिम कार्डवरून त्याने संतोष कुरपे याला फोन केला होता. त्यावर, गेम केला मास्टरमाईंडला सांगा, असं संभाषण झालं होतं. आता कुरपे हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो मास्टरमाईंड रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार हे आता पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती, आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.