चिपळूण / 31 ऑगस्ट 2023 : हल्ली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अगदी सुशिक्षित लोकंही याला अपवाद नाही. सायबर गुन्हेगार उच्चशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असणाऱ्या लोकांनाही सहज आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. पॅनकार्ड आणि एमपिन अपडेट करण्यास सांगत अभियंत्यालाच पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात उघडकीस आली आहे. रविकरण सिताराम पिंपळे असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
रविकिरण पिंपळे यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. सदर व्यक्तीने आपले अॅक्सिस बँकेतील खाते बंद होण्याची शक्यता असल्याचे पिंपळे यांना सांगितले. यानंतर पिंपळे यांना व्हॉट्स अपवर एपीके नावाची फाईल मॅसेज केली. ही फाईल ओपन करुन पॅनकार्ड आणि एम पिन अपडेट करण्यास सांगितले. पिंपळे यांनीही बँक खाते बंद होईल या भीतीने अज्ञात व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पॅनकार्ड आणि एम पिन अपडेट केले.
अपडेट करताच पिंपळे यांच्या खात्यात असलेली 19 हजार 388 रुपये आणि मालवेअर अॅपमधून 4 लाख 92 हजार 115 रुपयाचं कर्ज घेतले. कर्जाची रक्कम पिंपळे यांच्या खात्यात जमी केली. मग पिंपळे यांच्या खात्यातून 4 लाख 86 हजार 498 रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले. तर सिंग नामक व्यक्तीने पिंपळे यांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिंपळे यांनी चिपळूण पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पिंपळे यांच्या तक्रारीवरुन चिपळूण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.