रत्नागिरी / 4 ऑगस्ट 2023 : दापोलीत तरुणीच्या मृत्यूचे रहस्य कायम असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा हत्याकांडाची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरण उघडकीस आले आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अज्ञात कारणातून पतीने पत्नीसह सहा वर्षाच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. सोनाली चांदिवडे असे मयत महिलेचे नाव आहे. तर संदेश चांदिवडे असे आरोपी पतीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. चांदिवडे याला आणखी एक मुलगा असून, तो सुखरुप आहे. दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संदेश चांदिवडे हा आई, पत्नी आणि दोन मुलांसह लांजा तालुक्यातील पाष्टे या मामाच्या गावात राहत होता. संदेश वीज मीटरचे रिडिंग घेण्याचे काम करत होता. अज्ञात कारणातून गुरुवारी पहाटे संदेश पत्नी सोनालीवर कोयत्याने वार करुन आणि सहा वर्षाच्या मुलाला गळा आवळून संपवले. यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला. सकाळी सासू उठली तर सून कुठे दिसली नाही, म्हणून सुनेला हाका मारत सासू घराच्या मागच्या बाजूला गेली. मात्र तेथे जाताच समोरील दृश्य पाहून तिला धक्का बसला. सून रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
सुनेचा आणि नातवाचा मृतदेह पाहून सासूने हंबरडा फोडला. सासूचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी लांजा पोलिसांना घटनेची माहिती दिली. लांजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. महिलेचा पती घटनास्थळाहून फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी पोलीस पथक नेमून पतीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंती हत्याकांडाचे कारण स्पष्ट होईल.
संदेशची आई आणि तीन वर्षाचा दुसरा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपले होते. यामुळे छोटा मुलगा बचावला आहे. संदेश हा शांत स्वभावाचा आहे. त्याला कुठलेही व्यसन नव्हते. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत गूढ अद्याप कायम आहे.