अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. (Rekha Jare Murder Case Main Accuse Bal Bothe arrested from Hyderabad)
काय होती घटना?
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.
बाळ बोठेचा साडेतीन महिन्यांपासून गुंगारा
अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते.
पाच आरोपींविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर
या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.
बाळ बोठे शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन करत होता. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.
हनी ट्रॅप आणि समझोता
गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत
संबंधित बातम्या :
जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?
(Rekha Jare Murder Case Main Accuse Bal Bothe arrested from Hyderabad)