नोएडा : बिर्याणी आणण्यास उशिर केला म्हणून काही मवाली तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम चोपल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. मारहाणीची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. ग्रेटर नोएडाच्या अन्सल मॉलमध्ये ही घटना घडली आहे.
गुरुवारी तीन तरुण ग्रेटर नोएडातील अंसल मॉलमधील जोक रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. यावेळी या तरुणांनी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र ऑर्डर यायला वेळ लागल्याने तरुणांचा संताप झाला.
संतापलेल्या तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. मनोज, प्रवेश आणि जगत सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दादरी येथील रहिवासी आहेत. आता पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील एका रेस्टॉरंटमध्येही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. कौशांबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर काही लोक दारु पीत मोठ्याने ओरडत होते.
यावेळी रेस्टॉरंट चालकाने या लोकांना आवाज आणि शिवीगाळ करण्यास मनाई केली. यावरून आरोपींनी प्रथम रेस्टॉरंटचे संचालक महेश वर्मा यांच्याशी बाचाबाची केली. नंतर लोखंडी रॉडने डोक्यात वार करून जखमी करत आरोपी फरार झाले.