डोंबिवली : कर्ज फेडण्यासाठी तरुणाने शक्कल लढवली आणि ही शक्कल त्याला तुरुंगात घेऊन गेली. कर्जबाजारी झाल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होता. यादरम्यान त्याला एक शक्कल सुचली. त्याने आधी काम करत असलेल्या डॉमिनोझ पिझ्झाच्या शॉपमधून 80 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. शॉपमध्ये गेल्यानंतर आधी त्याने सीसीटीव्ही बंद केले. मग रोकड चोरुन पोबारा केला. दुसऱ्या दिवशी शॉप सुरु केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर दुकान मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही बंद केल्यामुळे आपण पकडले जाणार नाही असा आरोपीचा समज होता. मात्र पोलिसांनी त्याला हेरलेच. आरोपीला अटक करुन तुरुंगात रवानगी केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील चिपळुणकर रोडवरील डॉमिनोझ पिझ्झाच्या शॉपमध्ये ही चोरीची घटना घडली. विशेष बाब म्हणजे कोणतीही तोडफोड न करता सराईतपणे ही चोरी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. बनावट चावीचा उपयोग करत आरोपीने शॉपमध्ये घुसून गल्ल्यावर डल्ला मारला. आरोपी शॉपमध्ये घुसताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
आरोपी हा याच डॉमिनोझ पिझ्झामध्ये नोकरी करत होता. मात्र दारु पिऊन कामावर यायचा, यामुळे 20 दिवसापूर्वी त्याला कामावरुन काढून टाकले होते. मात्र शॉपची चावी त्याने काम सोडताना दिली नव्हती. चावी हरवली असे मालकाला सांगितले होते. दारुच्या व्यसनामुळे आरोपी कर्जबाजारी झाला होता. त्यात नोकरी गेल्याने बेरोजगारही झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने कामाच्या ठिकाणी चोरी करण्याचा प्लान केला.
आरोपीने आपल्याकडीन चावीने दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानात शिरताच आधी सीसीटीव्ही बंद केले. त्यानंतर दुकानातील रोकड घेऊन पुन्हा दुकान बंद करुन निघून गेला. मात्र हॉटेलमध्ये घुसताना त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सकाळी दुकान उघडताच चोरीची घटना उघड झाली. यानंतर दुकानमालकाने रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार सचिन भालेराव, विशाल वाघ, पोलीस नाईक हनुमंत कोळेकर, पोलीस शिपाई शिवाजी राठोड, भूषण चौधरी यांच्या पथकाने 24 तासात संबंधित गुन्हा उघडकीस आणून आरोपी विजयला बेड्या ठोकल्या.