चंदिगढ : मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (Grenade) फायर करण्यासाठी वापरलेले लाँचर (Launcher) जप्त करण्यात आले आहे. मुख्यालयावर सोमवारी रात्री हल्ला (Attack) केला गेला होता. त्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडून सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाचवेळी समांतर तपास सुरु करून संशयितांची धरपकड सुरु केली आहे. या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला आहे. यामागे दहशतवादी संघटनेचा हात आहे का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. पंजाबसह हरियाणातही संशयितांची धरपकड सुरू आहे.
पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावरील हल्ल्यामागील खळबळजनक कटाचा उलगडा झाला आहे. या हल्ल्यासाठी ‘ट्राय नायट्रो टाल्यून’ (टीएनटी) या स्फोटकाचा वापर करण्यात आला. हल्लेखोरांनी मुख्यालयाची इमारत उडवून देण्याचा कट आखला होता. यादरम्यान हल्लेखोराचा निशाणा चुकला आणि स्फोटक खिडकीतून आत जाण्याऐवजी भिंतीवर आदळले. स्फोटक थेट खोलीत गेले असते तर मोठी हानी झाली असती, असे पंजाबचे डीजीपी भावरा यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पंजाब पोलिसांची दोन पथके हरियाणाला गेली असून त्या पथकांमध्ये 15 पोलिस आहेत. मंगळवारी सकाळी निघालेली ही पथके मोहालीला लागून असलेल्या हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये छापे टाकत आहेत. यापैकी एका टीमने चंदिगढ-नवी दिल्ली राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हरियाणाच्या भागांवर लक्ष केंद्रित करीत तपास सुरु ठेवला आहे. हल्ला झालेल्या इमारतीत संघटीत गुन्हेगारी नियंत्रण शाखा व दहशतवादविरोधी टास्क फोर्सचेही कार्यालय आहे. त्यामुळे यामागे गँगस्टर्सचाही हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याप्रकरणी अंबाला येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हा हल्ला जवळपास 80 मीटर दूर अंतरावरून केला गेला असावा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांसोबत राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रचंड अॅक्टीव्ह झाली आहे. हल्ल्यासाठी टीएनटी स्फोटकाचा वापर करण्यात आला आहे. हे स्फोटक विशेषतः अफगाणिस्तानमध्ये वापरण्यात येते. त्यामुळे या हल्ल्यामागेही अफगाणिस्तान कनेक्शन आहे का? यादृष्टीने एनआयएकडून तपास सुरू आहे. या केंद्रीय यंत्रणेचे एक पथक मंगळवारी सकाळीच पंजाबमध्ये दाखल झाले आणि पथकाने तपास सुरु केला.