शंकर देवकुळे, सांगली : बनावट सोने गहाण ठेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जतमध्ये उघडकीस आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोरडी शाखेत हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कर्जदारांसह सराफ अशा आठ जणांच्या विरोधात बँकेची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बनावट सोने गहाण ठेवून कर्ज काढण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या कर्जदाराचे गहाण ठेवलेल्या सोन्यांमध्ये घट आल्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे एकूणच जिल्हा बँकेतल्या सोने गहाण कर्ज योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या सोरडी शाखेमध्ये गावातल्या सात जणांनी 26 ऑक्टोबर 2022 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान बँकेचे व्हॅल्यूएटर असणाऱ्या सराफ यांच्याशी संगनमत करून, वेगवेगळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. बनावट दागिने गहाण ठेवत सुमारे 25 लाख 75 हजार इतके रक्कम कर्ज स्वरूपात घेतले. काही काही दिवसांपूर्वी बँकेच्या तपासणीमध्ये गहाण ठेवण्यात आलेले सोने बनावट असल्याचे बँकेच्या तपासणीमध्ये समोर आले आहे. यानंतर बँकेकडून जत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत सात कर्जदार त्याचबरोबर बँकेचे व्हॅल्यूएटर सराफ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील चंदूकाका अँड सन्स सराफा व्यापाऱ्याला कर्मचाऱ्यांनीच गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अकाऊंट्स विभागात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल 106 तोळे लंपास केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी दोघाही आरोपींना अटक केली आहे. दुकानातील सोने दुसरीकडे गहाण ठेवत त्यातून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे.