पणजी | 23 फेब्रुवारी 2024 : गोवा सध्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गोव्यात एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका रशियन नागरिकावर या संदर्भात आरोप करण्यात आले आहेत. ही घटना 4 फेब्रुवारीच्या रात्रीची आहे. कुटुंबीयांना या घटनेची माहिती उशिराने मिळाली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी 19 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या रशियन नागरिकावर आयपीसीच्या कलम 376 आणि जीसी कायद्याच्या कलम 8 (2) आणि पोक्सो अॅक्टच्या कलम 4,8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
ही घटना नॉर्थ गोव्यातील अरंबोल परिसरात झाली आहे. आरोपी इलिया वसूलेव याने नाईट कँपचं आयोजन केलं होतं. तिथेच हा प्रकार घडला. पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही. आरोपीला अटक करण्यासाठी गोवा पोलीस रशियन ऑथरिटीची मदत घेत आहे.
टुरिझम इंडस्ट्रीतून गोव्याला मोठं उत्पन्न मिळतं. गोवा नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकही गोव्यात येत असतात. पण अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जातात. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीने महिला पर्यटकांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने 2023मध्ये एक सर्व्हे केला होता. त्यात, 42 टक्के लोकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं म्हटलं होतं. कायदा सुव्यवस्था बिघडल्यानेच गोव्याच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचा दावाही या लोकांनी केला होता.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या डेटानुसार 2020 आणि 2021 मध्ये टुरिस्टशी संबंधित गुन्ह्यात 15 टक्क्याने वाढ झाली आहे. कोव्हिडच्या आधीच्या आकड्यांशी याची तुलना केल्यास या गुन्ह्यात 12 टक्क्यांची घट आहे. लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही, त्यामुळेच हे गुन्हे घटल्याचंही सांगितलं जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी, टॅक्सी ड्रायव्हर, वेंडर आदींवर होत आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
दरम्यान, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनीही सरकारला घेरलं आहे. गोव्यातील गुन्हे का वाढत आहेत? मुख्यमंत्री काय करत आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा संताप विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात गोव्यातील गुन्हेगारी हा मोठा आणि हॉट विषय राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.