सांगली / शंकर देवकुळे : मिरजेत अॅक्सिस बँकेच्या दहा ग्राहकांची 90 लाखाला फसवणूक करून फरार झालेल्या सेल्स ऑफिसरला पोलिसांनी अटक केली आहे. तोहीद शरिक मसलत असे फसवणूक करणाऱ्या सेल्स ऑफिसरचे नाव आहे. या फसवणूक प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मिरज पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरु केला. अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. आरोपीला अटक करत पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
मिरजेतील ॲक्सिस बँकेत तोहीद शरीक मसलत याची सेल्स ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सेल्स ऑफिसरने तीन वर्षात बँकेतील ग्राहकांचा विश्वास संपादन करून 90 लाखाचा गंडा घालून फरार झाला होता. जेव्हा बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यावरील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच बँक ग्राहकांनी ॲक्सिस बँकेत तसेच मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
फसवणूक झालेल्या ग्राहकांनी मिरज पोलीस ठाण्यात तोहीद विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 10 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी तोहिद विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरु केला. अखेर आरोपीला पकडण्यास मिरज पोलिसांना यश आले आहे.
शहरातील शिवाजीनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँक फोडून बँकेचे महत्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप जाळण्याचा प्रयत्न केला. या चोरीत बँकेचे दागदागिने असणारे लॉकर चोरटे तोडू शकले नाही. मात्र बँकेचे महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप अज्ञात चोरट्याकडून जाळण्यात आले. यावेळी चोरटे बँकेतील दहा हजार रुपयांची चिल्लर घेऊन पसार झाले. दरम्यान याविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.