रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पनवेल | 8 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खानचं पनवेलचं फार्महाऊस खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
दिली खोटी माहिती
अजेशकुमार ओमप्रकाश गिल (वय २३) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख (वय २३, रा. पंजाब) अशी त्यांची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनी 4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले होते. तेव्हा त्या दोन तरूणांनी खोटी नावं सांगितली. महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम अशी आमची नावं असून उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र त्या सुरक्षारक्षकींना दोघा तरूणांचा संशय आल्याने, त्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलिसांनी केली तपासणी
त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत तरूणांची चौकशी केली असता, त्यांनी आपली खरी नावं सांगितली. त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता दोघांनी आपले छायाचित्रे वापरून बनावट नावाने आधार कार्ड बनवल्याचे आढळले. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. सलमान खान याला भेटण्यासाठी दोन्ही तरूणांनी घुसखोरीचा हा खटाटोप केल्याचे चौकशीत सांगितले.