मुंबई : एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआयनं नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. तपास प्राथमिक अवस्थेत असल्यानं वानखेडेंना दिलेला अटकेपासूनचा दिलासा रद्द करण्याची सीबीआयने मागणी केली आहे. मात्र समीर वानखेडे यांना दोन आठवडे संरक्षण कायम ठेवत, याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. पुढील सुनावणी 23 जूनला होणार आहे. यावेळी सुनावणीला समीर वानखेडे यांच्यासह सीबीआयची टीम आणि NCB चे डीडीजी ज्ञानेश्वर सिंगही उपस्थित होते.
एनसीबीची एक टीमही कोर्टात हजर होती. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा आणि बहिणीचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. ज्ञानदेव वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही माहिती दिली.
याआधी मुंबई उच्च न्यायालयात 22 मे रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा कायम ठेवला होता. 8 जूनपर्यंत वानखेडे यांना अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला कोर्टाने दिले होते. या प्रकरणात 3 जून रोजी सीबीआयला आपला अहवाल कोर्टात सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर 8 जूनला या प्रकरणात पुढील सुनावणी होणार होती. मात्र आज झालेल्या सुनावणीतही कोर्टाने वानखेडे यांना दिलासा कायम ठेवला आहे. यानंतर पुढील सुनावणी 23 जून रोजी होणार आहे.