सहकारी कबड्डीपटूंसोबत झालेला वाद सांगलीतील एका तरूणाला चांगलाच भोवला असून त्यामुळे त्याला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला. जुन्या वादातून चौघांनी एका तरूणाला मारहाण करून, त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सांगलीतील जामवाडी येथे घडली. अनिकेत हिप्परकर असे मृत कबड्डीपटूते नाव आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी मरगुबाई मंदिरासमोर अनिकेत याच्यावर हल्ला चढवत त्याचा खून केला. त्यांनी अनिकेतच्या डोक्यावर कोयत्याचा वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. संध्याकाळी झालेल्या या खुनामुळे परिसरामध्ये एकच भीतीच वातावरण निर्माण झाले. खुनाची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासहित पीएसआय खाडे एपीआय पाटील यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकही रवाना झाली असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
व्यायामासाठी घराबाहेर पडला तो आलाच नाही..
मृत अनिकेत हिप्परकर हा कबड्डीपटू असून तो कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. आज नेहमीप्रमाणे तो पावणेपाचच्या सुमारास व्यायामासाठी घरातून बाहेर पडला. तेव्हा जामवाडी येथील मरगुबाई मंदिरासमोर त्याला चार हल्लेखोरांनी गाठलं. त्यांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दोन कोयत्यांचा वापर या घटनेत केला. हल्लेखोरांनी अनिकेत त्याच्या डोक्यावर दोन्ही कोयत्याने जबर हल्ला केला, तो जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर चारही हल्लेखोर तेथून फरार झाले.
हल्लेखोरांनी जोरदार प्रहार करीत कोयत्याचा वार केल्याने दोन्ही कोयते हे अनिकेतच्या डोक्यात अडकून पडले होते. काही अंतरावरच असलेल्या घरात अनिकेत त्याच्या आजीसोबत रहायचा. त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजतात त्याची आजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत एकच हंबरडा फोडला.
दरम्यान सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली. याचबरोबर श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमकडून सुध्दा घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा मागोवा घेतला. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी बरीच गर्दी केली होती.
सहकाऱ्यांसोबत झाला होता वाद
मृत अनिकेत हा कबड्डीपटू असून त्याने अनेक सामने जिल्हा संघाकडून खेळले होते. काही दिवसांपूर्वी त्याचा सहकारी कबड्डीपटूसोबत वाद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनात राग धरून त्याच्याच सहकारी कबड्डीपटूंनी त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेत चौघा हल्लेखोरांचा समावेश असून या चौघांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली.