सांगली : सांगलीत (Sangli Crime News) व्यावसायिकाच्या अपहरणाचं वृत्त समोर आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मिरज (Sangli Kidnapping) तालुक्यातील तुंग इथं घडली आहे. शनिवारी 13 ऑगस्ट ही घटना घडली असून आता हा प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील (Manikrao Patil) यांचं अपहरण करण्यात आलं. प्लॉट दाखवण्याच्या आमिषाने त्यांना कारमधूनच रातोरात अपहरणकर्त्यांनी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सांगली ग्रामीण पोलिसांत या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीनुसार आता सांगली पोलिसांनीही या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरु केलाय. अपहरण करण्यात आलेले माणिकराव पाटील हे बांधकाम व्यवसायिक आहे. ते जमीन खरेदी करुन बांधकाम करण्याचा व्यवसाय करत होते. माणिकराव पाटील यांच्या अपहरणाचं वृत्त कळल्यानं सांगलीतील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजलीय.
दरम्यान, सांगलीच्या तासगावात तीन आठवड्यांपूर्वी एका बाळाचंही अपहरण करण्यात आलेलं होतं. या घटनेनंही खळबळ माजलेली. एका नवजात बाळाचं नर्सनेच अपहरण केलं होतं. 24 जुलै रोजी ही अपहरणाची घटना समोर आली होती. त्यानंतर सीसीटीव्हीतही बाळाला पळवून नेणारी महिला कॅमेऱ्यात कैद झाली होती. अपहरणाच्या तक्रारीनंतर अखेर आरोपी महिलेला पकडण्यातही यश आलं होतं. दरम्यान आता एका बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणामुळे सांगलीत नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.
सांगलीतल्या मिरजमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाची तक्रार मिळाल्यानंतर आता पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवली आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचं लोकेशन, माणिकराव पाटील यांच्या ओळखीच्या लोकांकडून माहिती गोळा करणे, असा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, आता माणिकराव पाटील यांचं अपहरण कुणी केलं असावं? अपहरण करण्यामागे नेमकं कारण काय? 13 ऑगस्टला अपहरण झाल्यानंतर आता चार दिवस निघून गेले, तरी काहीच पत्ता कसा लागला नाही? अशा सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचं आव्हान सांगली पोलिसांसमोर उभं ठाकलंय.