सांगली | 10 जानेवारी 2024 : अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपींना चार वेळेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आश्रम शाळेतील हे प्रकरण आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस.गांधी यांनी हा निकाल दिला असून एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कुरळप (ता.वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेतील असहाय्य अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं होतं.
अखेर याच खटल्याचा आता निकाल लागला असून या खटल्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या खटल्यातील आरोपी अरविंद पवारसह
मदतनीस महिला मनीषा कांबळे या दोघांना चारवेळा जन्मठेप आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात स्वतंत्र शिक्षा दिली.दंडाची रक्कम न भरल्यास दोघांना आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे. एकावेळी चार जन्मठेप देण्याची सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
अरविंद आबा पवार (६६) आणि मनीषा चंद्रकांत कांबळे (४३,दोघे रा.कुरळप) अशी या निकालात शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली.अत्याचारित चार पीडित मुलींना दंडाच्या रकमेतील प्रत्येकी ५० हजार रुपये तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देशही न्या. गांधी यांनी दिले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात बलात्कारासाठीच्या भारतीय दंडविधानातील विविध कलमाखाली आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार ही शिक्षा सुनावली.
असं उघडकीस आलं प्रकरण
पाच वर्षांपूर्वी, सप्टेंबर 2018 मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे एक निनावी पत्र आलं. त्या पत्रावरूनच पोलीसांनी या अत्याचाराच्या घटनेची पोलखोल केली. त्यानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. दोघांविरुद्ध येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यावर या खटल्याची सुनावणी सुरू होती. पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने हा इतक्या मोठ्या शिक्षेचा दणका आरोपींना दिला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस सूर्यवंशी यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.