दुचाकीवर पोतं आणि त्या पोत्यात निघाल्या तलवारी, सांगलीत पोलिसांची सापळा रचत मोठी कारवाई

| Updated on: Jul 21, 2024 | 10:45 PM

सांगलीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांगलीत एक तरुण तलवारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दुचाकीवर पोतं आणि त्या पोत्यात निघाल्या तलवारी, सांगलीत पोलिसांची सापळा रचत मोठी कारवाई
दुचाकीवर पोतं आणि त्या पोत्यात निघाल्या तलवारी
Follow us on

सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 10 तलवारी आणि एक दुचाकी असा 65 हजारांचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केला आहेत. भगतसिंग विक्रमसिंग शिख असे तलवारींसह पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. त्यातच एक तरूण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून शिख याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी भगतसिंग विक्रमसिंग शिख याच्या दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर, त्यामध्ये तलवारी सापडल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून दुचाकी आणि तलवारी जप्त केल्या आहेत. दरम्यान, सदर व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.