सांगली : फक्त कल्पना करा, की तुम्ही एसटी बसमधून प्रवास करताय आणि एसटी बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला अचानक चक्कर आली, तर? प्रवासी म्हणून तुम्ही हतबल असता. आता जीवाचं काही खरं नाही, असं प्रवासी म्हणून तुम्हालाही वाटेलच. नेमकी हीच परिस्थिती एका एसटी बसच्या प्रवासादरम्यान 30 प्रवाशांना आली. परळी-चिपळूण एसटी बसच्या प्रवासात घडलेला एक थरारक प्रसंग आता समोर आला आहे.
चालत्या एसटीदरम्यान चालकाला अचानक चक्कर आली. चालकाला चक्कर येतेय हे पाहून वाहकानं मोठ्या हिंमतीनं प्रसंगावधान राखलं आणि एसटीचं स्टेअरींग स्वतःच्या हाती घेतलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडली.
खानापूर तालुक्यातील भिवघाट जवळ एसटी बस चालवणाऱ्या एका चालकाला अचानक चक्कर आली. दरम्यान, शेजारी असणाऱ्या वाहकाने प्रसंगावनधान राखलं आणि एसटी बसंच स्टेअरींग आपल्या हातात घेऊन बस कंट्रोल केली. त्यामुळे चालक आणि वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण अगदी थोडक्यात वाचले. एसटी बसच्या वाहकानं दाखवलेल्या हिंमतीमुळे मोठा अनर्थ टळलाय.
परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतु ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवासीही भयभीत झाले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जण बालंबाल बचावले. तत्काळ त्याच अवस्थेत बस चालवित भिवघाट येथे आणण्यात आली. सदरच्या चालकावर त्वरीत उपचार करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी दैना उडाली होती.
एसटीचे वाहन संतोष वाडमारे यांनी म्हटलं की,
गाडी चालवत असताना अचानक चालकाला भोवळ आली. मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. चालक थरथर कापतो आहे, हे पाहून मी लगेचच स्टेअरींग हातात घेतलं. चालकाने डोक्याला हात लावला होता. त्यांनी ब्रेक लावला होता. पण गाडी उजव्या बाजूला जात होती. तितक्यात मी स्टेअरींग हातात घेऊ गाडी बाजूला घेतली. आता चालकाला रुग्णालयात दाखल केलं असून ते शुद्धीवरही आलेत. त्यांची प्रकृती आता सुधारतेय.
घाट चढून आल्यानंतर ड्रायव्हरचा चक्कर आल्या सारखं झालं, असं बसमधील प्रवाशांनी सांगितलं. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने चालकाला ड्रायव्हिंग सीटवर बाजूला बसवण्यात आलं. तिथपासून रुग्णालयापर्यंत संतोष वाडमारे यांनी ही बस आणली आणि चालकाला रुग्णालयात दाखल केलं, असं बसमधील प्रवासी म्हणाले.
एसटी वाहकामुळे चालकाचा तर जीव वाचलाच पण एसटी बसमधील प्रवासीही सुखरुप वाचले. एसटी वाहक संतोष वाडमारे यांनी दाखवलेल्या धाडसाचं एसटी बसमधील प्रवासांनी कौतुक करत त्यांचे आभारही मानलेत.
या एसटी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शंकाही काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ही घटना घाटात घडली असली तर मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. मात्र थोडक्यात सर्व प्रवाशी यातून बचावले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका बस चालकाने सहा जणांना चिरडलं होतं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता.
Shocking #CCTV footage of the moving metro bus, the driver of which unfortunately suffered massive heart attack while driving at Jabalpur in MP. The driver died on the spot & 6 people were injured in the accident. @News18India @CNNnews18 pic.twitter.com/HqfeNqFqAx
— Manoj Sharma (@ManojSharmaBpl) December 2, 2022
जबलपूरमध्ये घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. रहदारीच्या रस्त्यावरच ही घडना घडल्यानं मोठा अनर्थ घडलेला. तर यात हृदयविकाराचा झटका आल्यानं चालकाचा मृत्यू झाला होता. मात्र सांगलीत थोडक्यात मोठी दुर्घटना होता होता टळलीय. दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरुप बचावलेत.