नवी दिल्ली : कोट्यवधीची माया बॉलीवूडच्या चमचमत्या ताऱ्यांवर लुटवणाऱ्या आणि मनी लॉन्डरींगचा केसमध्ये सध्या दिल्लीच्या तुरूंगात असलेला घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याला कैद्यांचे हाल पाहून दया आली आहे. कैद्यांच्या कल्याणासाठी आपण 5.11 कोटीचा डिमांड ड्राफ्ट मदत म्हणून देण्यास तयार असून तो स्वीकारण्यासाठी तयार व्हावे असे पत्रच आरोपी सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीच्या तुरूंग महासंचालकांना लिहीले आहे. ही मदत चांगल्या मार्गाने कमावलेली असल्याचा दावाही त्याने केला आहे.
दिल्लीच्या तुरुंगात असलेला घोटाळेबाज सुकेश याला तरूंगातील सहकारी कैद्यांकडे जामिनासाठी देखील पैसे नसल्याचे पाहून त्यांची दया आली आहे. ज्या कैद्यांकडे आपल्या जामिनासाठी देखील पैसे नाहीत, आणि ते कित्येक वर्षे तुरूंगात खितपत पडून आहेत, अशा कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आपण त्यांचा एक सहकारी म्हणून मदत करायला तयार आहोत, असे पत्र त्याने तुरूंग महासंचालकांना बुधवारी लिहीले आहे.
या पत्रात सुकेश यानी पुढे लिहीले आहे की एक मानवी दुष्टीकोनातून माझ्यासारख्याच परिस्थितीतून जात असलेल्या माझ्या सहकाऱ्यांसाठी मी मदत देऊ इच्छीत आहे. माझा 5.11 कोटीचा डीमांड ड्राफ्ट कैद्यांच्या कल्याणासाठी स्वीकारण्यात यावा. 25 मार्च रोजीच्या वाढदिवसानिमित्त हा मदतनिधी स्वीकारण्यात यावा. हे आपल्यासाठी बर्थ डे गिफ्ट ठरेल असे त्यानी या पत्रात म्हटले आहे. या आधी आपण तुरूंग अधिक्षकांना पत्र लिहीले होते असे त्याने म्हटले आहे.
गुन्हेगारी मार्गातून ही मदत नाही
आपल्या आवडत्या व्यक्ती तुरूंगात गेल्याने अनेक कैद्यांचे कुटुंबिय अडचणीत असून अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत. त्यांच्यासाठी माझ्या वैयक्तिक कमाईतून मदत करायला मी तयार आहे. जर ही मदत तु्म्ही स्वीकारायला तयार असाल तर माझे वकील या कमाईचा आर्थिक स्रौत आणि आयटीआर भरलेली कागदपत्रेही पुरावा म्हणून द्यायला तयार आहेत. ही रक्कम कोणत्याही गुन्हेगारी मार्गातून कमावलेली नसल्याचे त्याने म्हटले आहे.
चॅरिटीची कामे
आपण आणि आपली फॅमिली एनजीओ शारदा अम्मा फाऊँडेशन तसेच चंद्रशेखर कॅन्सर फाऊँडेशन मार्फत गेली अनेक वर्षे चॅरिटीची कामे करीत आहे. या संस्थेमार्फत दक्षिण भारतातील अनेक गरीबांना अन्न दिले जात आहे. तसेच अनेक गरीब कॅन्सरग्रस्तांना दर महिन्याला मोफत केमोथेरपी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपी सुकेश याने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आणि नोरा फतेही यांना महागडी गिफ्ट दिल्याने त्याही अडचणीत आल्या होत्या. सुकेश याला 200 कोटीच्या घोटाळ्यात दिल्लीच्या मंडोली तरुंगात ठेवले आहे.