लोकलमधून प्रवास करताना महिलांच्या डब्यातून चोरी करणाऱ्या महिलांची संख्या देखील मोठी आहे. कल्याण आणि शहाडच्या दरम्यानच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेची सोनसाखळी हिसकविणाऱ्या एका महिला चोराला सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातून अटक केली आहे. या महिलेने आपल्या मुलगा बारावीत असून त्याची फि भरण्यासाठी चोरी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीमुळे या गुन्ह्यातील आरोपीपर्यंत पोलिस पोहचले.
कल्याण-शहाड दरम्यान लोकलमध्ये एका प्रवासी महिलेची चैन चोरीला गेली होती. मात्र महागडी चैन चोरल्याने या प्रवासी महिलेने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला आढळून आली. पोलिसांना या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध सुरु केला. संशयित महिला विठ्ठलवाडी स्टेशनला उतरली असल्याचे निदर्शनास आले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तिच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण कुटे यांच्या पथकाने या महिलेला अटक केली. चोरी केलेले दागिने देखील हस्तगत करण्यात यश आले.
नवऱ्याने दुसरी बायको केली. आपण चार मुलांचा उदरनिर्वाह करायचा कसा ? त्यामुळे आपण काही काळ छोटे मोठे काम करून आपल्या मुलांचे पालन पोषण केले. त्यादरम्यान मला आजारपण जडले. उपचार करण्यासाठी मुंबईत मी भावाकडे आली. माझ्या 12 वीत शिकणाऱ्या मोठ्या मुलाची फी भरायची होती.त्यामुळे आपण लोकलमध्ये एका महिलेची चैन हिसकावली असे कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या कविता सिदम ( नाव बदललेले आहे )हीने सांगितले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण कुटे यांच्या पथकाने या आरोपी महिलेला अटक केली.