सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : दुचाकी कशा पडल्या विचारले म्हणून सात-आठ जणांच्या टोळक्याने मैदानात फुटबॉल खेळणाऱ्या शाळकरी मुलांना बेदम मारहाण (Beaten to School Girls) केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसात (Khadakpada Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजेश केणे, मुकेश भधोरीया, योगेश केणे, मनोज केणे, निलेश केणे यांच्यासह इतर दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे.
काही शाळकरी मुले मंगळवारी सायंकाळी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जे.पी. पोस्टर मैदानावर फुटबॉल खेळण्यास गेली होती. यावेळी मुलांनी आपल्या बाईक ऑटो झोन कार्यशाळेच्या प्रवेशाद्वारासमोर उभ्या केल्या होत्या.
काही वेळात बाईक खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तेथे उभ्या असलेल्या राजेश केणे याच्याकडे दुचाकी कशा पडल्या असी विचारणा केली. याचा राग आल्याने राजेशने विचारणा करणाऱ्या मुलाला मारहाण केली.
एका मुलाला मारहाण केल्याने अन्य मुलांनी राजेश मारहाण का केली अशी विचारणा केली. तर एका मुलाने आपल्या वडिलांना मारहाणीबाबत फोन करुन सांगितले म्हणून त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर राजेशने आपल्या साथीदारांना फोन करुन बोलावले आणि सर्व मुलांना शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपी तेथून फरार झाले. याप्रकरणी एका मुलाच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.