नोएडा : रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करणे हा जणू रोजचा दिनक्रमच बनला आहे. रील्स करण्याच्या नादात लोक काय करतीय याचा नेम नाही. रील्ससाठी जीवघेणी स्टंटबाजी करताना कधी कधी स्वतःचा आणि सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण स्कॉर्पिओ गाडीत बसून खतरनाक स्टंटबाजी करत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच नोएडा फेस 1 पोलीस ठाणे आणि ट्रॅफिक पोलीस विभाग तपास करत आहेत.
हा धोकादायक व्हिडिओ नोएडा येथील दलित प्रेरणा स्थळाजवळ बनवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, “तेरी काली स्कॉर्पियो चर्चा में हर नाके पर या रोकी जा, असल तो गाडी रुकती ना, जब रुके तो गोली ठोकी जा” हे गाणे देखील वाजत आहे.
व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसत आहे आणि गाडीला नंबर प्लेट पण दिसत नाही. नागमोडी वळणं घेत तरुण भररस्त्यात स्कॉर्पिओ पळवत आहे. गाडीचा वेग इतका आहे की चाकातून धूर निघत आहे.
हा व्हिडीओ दुसऱ्या कारमधून चित्रीत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळचा आहे. पोलीस आरोपी तरुणांचा शोध घेत आहेत.
नुकताच गाझियाबादमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही मुलं इको स्पोर्ट्स कारच्या खिडकीला लटकून स्टंट करताना या व्हिडिओत दिसत होती. पोलिसांनी तिन्ही मुलांना अटक करत त्यांची कारही जप्त केली.