गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचं ड्रग्स पकडलं , 14 पाकिस्तानी तस्कर ताब्यात

| Updated on: Apr 29, 2024 | 8:36 AM

गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचं ड्रग्स पकडण्यात आलं आहे. पाकिस्तानी बोटीवर 600 कोटी रुपये किमतीचं 86 किलो ड्रग्स सापडलं. तटरक्षक दल,एटीएस आणि एनसीबीने मोठी कारवाई केली आहे,. 14 पाकिस्तानी तस्करांना एटीएसने ताब्यात घेतलं.

गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचं ड्रग्स पकडलं , 14 पाकिस्तानी तस्कर ताब्यात
Follow us on

गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. दहशतवाद विरोधी पथक (ATS), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि तटरक्षक दल यांनी संयुक्त कारवाई करत गुजरातच्या किनारपट्टीवरून 86 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. बाजारात त्याची किंमत अंदाजे 600 कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईदरम्यान 14 पाकिस्तानी तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईदरम्यान अटक टाळण्यासाठी बोटीवरील तस्करांनी एटीएस अधिकाऱ्यांवर बोट चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेतेर्फे गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय जलक्षेत्रात शोध मोहीम राबवण्यात येत होती.

भारतीय तटरक्षक दलाने गुप्तचरांच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन केले. ज्यामध्ये पाकिस्तानी बोटीच्या 14 कर्मचाऱ्यांसह 602 कोटी रुपयांचे सुमारे 86 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या सहकार्याने यशस्वी ऑपरेशन केले. या मोहिमेसाठी भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती.NCB आणि ATS अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या राजरतन या ICG जहाजाने संशयास्पद बोट ओळखली. अंमली पदार्थांनी भरलेल्या बोटीच्या चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तटरक्षक जहाज राजरतनने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईच्या एक दिवस आधी, एनसीबीने गुजरात आणि राजस्थानमध्ये ‘म्याऊ म्याऊ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेफेड्रोन या प्रतिबंधित औषधाची निर्मिती करणाऱ्या तीन लॅबचा पर्दाफाश केला आणि 7 जणांना अटक केली. तसेच सुमारे 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते.

तामिळनाडूद्वारे श्रीलंकेला जाण्याचा होता प्लान

काल गुजरात पोलिसांच्या एटीएसला अंमली पदार्थांवर कारवाई करण्यात मोठे यश मिळाले असे गुजरातचे डीजी विकास सहाय म्हणाले. लोकसभा निवडणुकीत गुजरात पोलीस वेगवेगळ्या पॅरामीटरवर काम करत आहेत. पाकिस्तानी नागरिक हाजी अस्लम याने पाकिस्तानी मासेमारी बोटीतून ड्रग्ज पाठवल्याची माहिती 21 एप्रिल रोजी एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली होती. ते तामिळनाडूमार्गे श्रीलंकेला जाणार होते. ही माहिती पोलिसांना देऊन त्यानुसार, रणनीती आखण्यात आली.

आरोपींनी केला गोळीबार

25 आणि 26 तारखेच्या रात्री पाकिस्तानी बोटीची ओळख पटवण्यात आली. यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने अल रझा बोट पकडली. या काळात गोळीबारही झाला. यानंतर एटीएसचे दुसरे पथकही या कारवाईसाठी रवाना झाले. अल रझा बोटीने आत्मसमर्पण केले तेव्हा या बोटीवर 14 पाकिस्तानी तस्कर होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 86 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 600 कोटी रुपये आहे.