नोऐडा : आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानी लष्करात मेजर आहे अशी माहिती उजेडात आली आहे. खरंच असे काही आहे का? ही बातमी कशी समोर आली? गेल्या काही महिन्यांत सर्वात हिट लव्हस्टोरी ठरलेली सीमा हैदर नेमकी कोण आहे असा प्रश्न आता पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. सचिन मीनाच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आल्याचे सीमा हैदर सांगत असली तरी तिच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सीमा हैदर हिचे काका आणि भाऊ हे पाकिस्तानी लष्करात आहेत. तर, दुसरीकडे सीमादेखील स्वतःला सतत निर्दोष सांगत आहे. सचिन याच्यावर असलेल्या प्रेमाचा दावा करत ती कधी देशाचा तिरंगा फडकावून, कधी चांद्रयानच्या यशासाठी उपोषण करून तर कधी गरोदरपणाबद्दल बोलते.
सीमा हैदर ही कायदेशीररित्या भारतात आली नाही. नेपाळ सीमेवरून तिने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. इथे आल्यानंतरही सीमा हिने अनेक महिने ओळख लपवून ठेवली. नेपाळच्या मंदिरात लग्न केल्याचा दावा करून तिने सचिनच्या घरी राहण्यास सुरुवात केली. सीमा हैदर पाकिस्तान मधून भारतात आली त्यावेळी 5 सिमकार्ड आणि 3 मोबाईल तिच्याकडे होते. त्यामुळेच सीमा हैदर हिच्यावर संशय निर्माण होत आहे.
सीमा हैदर ही पाकिस्थानी गुप्तहेर असल्याची चर्चा होत होती. त्यानुसार तपास यंत्रणेने तिची कसून चौकशी केली, मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही आता सीमा हैदर ही पाकिस्तानी लष्करात मेजर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच तिचे खरे नाव सीमा नाही. ती सचिन मीना याच्या प्रेमात पडल्याचे नाटक करत आहे असा आरोप आता तिच्यावर होत आहे.
भगवा क्रांती या ट्विटर व्हेरिफाईड युजरने हे सत्य समोर आणले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सीमा हैदर एका खास उद्देशाने भारतात आली आहे असे लिहिले आहे. तिचे खरे नाव सामिया रहमान असून ती पाकिस्तानी लष्करात मेजर आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
इंदू नावाच्या आणखी एका व्हेरिफाईड अकाउंटवरून असेच आणखी एक ट्विट केले आहे. यातही सीमा हैदर हिचा उल्लेख सामिया रहमान असा केला आहे. मध्यपूर्वेतील देशांमधून सीमा हैदर हिच्याबद्दल माहिती मिळाली. सीमा हैदरने ज्या चार मुलांना सोबत आणले आहे ती मुले तिची नाहीत असेही त्यात म्हटले आहे.
कोण आहे ही समिया रहमान? सामिया रहमान ही संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेसाठी काम करत आहे. सामिया रहमान हिने एका पाकिस्तानी टीव्ही मालिकेत काम केले होते. ज्यात तिने मेजरची भूमिका केली होती. सामिया रहमान आणि सीमा हैदर यांच्या चेहऱ्यात साम्य आहे. त्यामुळेच या लोकांनी असे ट्विट केले असावे असे म्हटले जात आहे.