सेल्फीमुळे चोराचा पर्दाफाश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमातच मारला डल्ला

| Updated on: Mar 18, 2025 | 1:48 PM

डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन काही चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका व्यक्तीने काढलेल्या सेल्फीमुळे चोरांचा पर्दाफाश झाला. एक चोर पकडला गेला, तर दोन फरार आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार चोरांचा शोध सुरू आहे.

सेल्फीमुळे चोराचा पर्दाफाश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमातच मारला डल्ला
सेल्फीमुळे पकडला चोर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

डोंबिवलीमध्ये नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं होतं. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. मात्र याच गर्दीचा फायदा घेत काही चोर डल्ला मारण्याच्या तयारीत होते. गर्दीत डाव साधत मौल्यवान वस्तू, पैसे लांबवण्याचा त्यांचा डावही होता. मात्र एका सेल्फीमुळेच त्यांचा हा डाव उधळला गेला आणि चोरांचा पर्दाफाश झाला. त्या सेल्फीमुळेच चोर कार्यक्रम स्थळीच पकडल गेला. गर्दीत लोकांचे दागिने आणि पाकीट लंपास करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतलं आहे मात्र दोन जण जून फरार असून त्या आरोपींचा शोध सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्यानंतर भाषण केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्याने ते खाली उतरत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी स्टेजच्या खाली लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच गर्दीत तीन चोरही होते. गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुटण्याचा त्यांचा डाव होता. ते सावज शोधतही होते. गळ्यातील गमछ्याचा आसरा घेत तीन जणांची टोळी सभा आणि गर्दीच्या ठिकाणी चोरी करत होती. मात्र सेल्फीमुळे त्यांचा पर्दाफाश झाला.

नेमकं काय घडलं ?

डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड उडाली. याच गर्दीचा फायदा घेत तीन चोरट्यांनी संधी साधून एका तरुणाची महागडी सोन्याची चेन लंपास केली. मात्र या वेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले ॲडव्होकेट गणेश पाटील हे सेल्फी घेत असताना त्यांच्या कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला. गणेश पाटील यांनी तात्काळ संशयित चोरट्याकडे पाहिले असता, त्याच्या हातात चोरी केलेली चेन असल्याचे लक्षात आले. त्यांनी आणि आणि जमावाने तत्काळ त्या चोरट्याला पकडत त्याचा चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुनील म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो अहमदनगरहून आपल्या दोन साथीदारांसह डोंबिवलीत आला होता. एक तीन जणांची टोळी सभा व गर्दीच्या ठिकाणी जाऊन गर्दीचा फायदा घेत ते लोकांची मूल्यवान वस्तू आणि पाकिटे चोरी करायची विशेष म्हणजे या टोळीची खास पद्धत होती, ती म्हणजे – त्यांचे दोन्ही साथीदार गळ्यात गमछा टाकून गर्दीत शिरायचे व आजूबाजूवाल्यांना दिसू नये यासाठी ते गमछा डोक्यावरती घ्यायचे. सुनील म्हस्के त्या आडून लोकांचे खिसे कापायचा. सध्या गर्दीत पकडल्या गेलेल्या सुनील म्हस्केला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचे दोन्ही साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत पण मानपाडा पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.