नालासोपारा : नालासोपारा पश्चिम येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका वकील दाम्पत्याला त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करणाऱ्या जोडप्याने जीवे मारण्याचा (Killed) प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी जोडप्याने वकील (Lawyer) दाम्पत्याचे तब्बल 12 लाखांचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) घेऊन पळ काढला. त्या पळून गेलेल्या जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नालासोपारा पोलीस करत आहेत. ब्रजेश भेल्लोरिया आणि डॉली भेल्लोरिया अशी पीडित पती-पत्नीची नावे आहेत.
घटनेनंतर वकील आणि त्याच्या पत्नीला बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांना शुद्ध आल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
वकील दाम्पत्याने महिनाभरापूर्वीच आरोपी जोडप्याला आपल्या घरी कामाला ठेवले होते. आरोपीपैकी पुरुषाला पहारेकरी म्हणून आणि महिलेला स्वयंपाकी म्हणून कामावर ठेवले होते.
भेल्लोरिया दाम्पत्य नालासोपारा पश्चिम येथील कलम बीचजवळ राजोडी येथील भेल्लोरिया हाऊसमध्ये राहतात. त्यांचा स्वयंपाकी गावी निघून गेला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून आोरपी लक्ष्मीला स्वयंपाकी आणि तिचा पती मानबहादूरला सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवले होते.
आरोपी जोडप्याने तक्रारदार वकील दाम्पत्याच्या घरी सुरुवातीला खूप मेहनतीने काम केले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लुटीचा प्लान आखला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
दोघांनाही कामावर ठेवताना ओळखपत्र आणि फोटो घेण्यात आले होते. 5 ऑगस्टपासून दाम्पत्य कामावर रुजू झाले होते. दोघेही आपले काम नीट करत होते. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची नालासोपारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वकील दाम्पत्याने त्यांच्याकडे कामावर ठेवलेल्या जोडप्याची पोलीस पडताळणी केली नव्हती, असे नालासोपारा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.