मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी हा केवळ 21 वर्षांचा आहे. पण मित्रांमध्ये हुशारी दाखवण्यासाठी आणि तंत्रज्ञानात कोणीच आपला हात धरु शकत नाही, हे दाखवण्यासाठी त्याने हा सर्व खटाटोप केला. त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडला. तो पोलिसाचा मुलगा आहे. त्याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई पोलिसांनी त्याची युक्ती त्याच्यावरच उलटवली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. खोट्या नावाचा वापर करत गुंगारा देणाऱ्या या शादाब खानला पोलिसांनी अशी अटक केली.
तीन वेळा ई-मेल
आरोपीने 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल पाठवला. 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटींची मागणी करण्यात आली. तिसरा मेल 30 ऑक्टोबर रोजी आला. थेट 400 कोटींची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे बेल्जियम या देशाशी कनेक्शन दाखवत होते. ई-मेल पाठवण्यासाठी आरोपी व्हीपीएन मास्किंगचा वापर करत असल्याने बेल्जियम लोकेशन दिसत होते. या ई-मेलमध्ये त्याने पोलिसांनाच आव्हान दिले होते.
वडील हेड कॉन्स्टेबल
पोलिसांनी आरोपीला गुजरातमधील कालोल येथून अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या, क्राईम इंटेलिजेंस युनिटने ही कारवाई केली. गुजरातमधील गांधीनगरमधील कल्लोल येथील राजवीर खंत नावाच्या 21 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याचे खरे नाव राजवीर कांत असल्याचे समोर आले. त्याचे वडील कालोल पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहे. त्याने shadabchan@mailfence.com या ईमेलवरुन त्याने शादाब खान या नावाने हा धमकीचा मेल पाठवाला आणि खंडणी मागितली होती.
अशी मिळाली माहिती
राजवीर कांत हा कम्प्यूटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकत आहे. डार्क वेबचे त्याने तंत्रज्ञान आत्मसात केले. मेलफेस अकाऊंटचा त्याने वापर केला. सध्या देशात त्याचे केवळ 500 युझर्स आहेत. त्यातील 150 जणच त्यावर सक्रिय आहेत. सर्च इंजिन त्याचे इंडेक्स करु शकत नाही. डार्क वेब हे अत्यंत धोकादायक मानण्यात येते. मोठे सायबर गुन्हे याच माध्यमातून करण्यात येतात. पोलिसांनी या सर्वांच्याच सर्फिंग एक्टिव्हिटी ट्रॅक केली.
ही चूक भोवली
कांत हा सातत्यानेत त्याचा आयपी एड्रेस बदलत होता. एका देशावरुन दुसऱ्या देशात आयपी एड्रेस बदलत असल्याने त्याला ट्रेस करणे अवघड झाले होते. पण पोलिसांची सायबर जगतावर नजर होती. त्याने एक चूक केली आणि पकडल्या गेला. आयपी एड्रेस बदलत असताना त्याच्या आयपी एड्रेसची माहिती दिली आणि तो दुसऱ्या क्षणाला ट्रेस झाला. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.