मुंबई : शाकिरा नमाजी खलीली (Shakereh Namazi Khaleeli) या भारतीय महिलेचा तिचा दुसरा पती स्वामी श्रद्धानंदने (Swami Shradhananda) अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. 1964 मध्ये तिने तत्कालीन भारतीय राजदूत अकबर खलीली यांच्याशी लग्न केले. 1985 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि पुढच्याच वर्षी तिने स्वामी श्रद्धानंदशी लग्न केले होते. मात्र 1991 मध्ये ती अचानक बेपत्ता झाली, त्यानंतर तीन वर्षांनी तिचा मृतदेह तिच्याच घरात जमिनीखाली पुरलेला आढळला होता. तिला ड्रग्ज देऊन बेशुद्धावस्थेतच शवपेटीसदृश्य मोठ्या बॉक्समध्ये पुरण्यात आले होते. शाकिराच्या हत्येप्रकरणी तिचा दुसरा पती श्रद्धानंदला 2005 मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2008 मध्ये ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.
कोण होती शाकिरा नमाजी खलीली?
शाकिरा नमाजी खलीली ही म्हैसूर राजघराण्याच्या दिवाणांची मुलगी होती. इराण आणि ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त अकबर मिर्झा खलीली यांच्याशी शाकिराचा विवाह झाला होता. वीस वर्षांच्या संसारात त्यांना चार मुली झाल्या. मात्र शाकिराच्या आयुष्यात एक पुरुष आला आणि दोघांच्या नात्याला तडा गेला.
कोण होता स्वामी श्रद्धानंद?
मुरली मनोहर मिश्राने स्वतःचे नाव बदलून स्वामी श्रद्धानंद ठेवले होते. तो एका राजघराण्यातील नोकर होता. 1982 मध्ये बंगळुरुतील एका कार्यक्रमात शाकिरा आणि तिचा पहिला पती अकबर खलीलीची श्रद्धानंदशी भेट झाली. त्यानंतर काही काळातच अकबर खलीली यांनी इराणमध्ये भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. या काळात शाकिराचे श्रद्धानंदशी प्रेमसंबंध जुळले.
शाकिराला चारही मुलीच होत्या, त्यामुळे तिला मुलाची आस लागली होती. मुलाच्या जन्माच्या इच्छेपोटी ती स्वामीला भेटली. यातून दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. अकबर खलीली इराणहून परतल्यावर शाकिराने त्यांना घटस्फोट दिला. सहा महिन्यांनंतर एप्रिल 1986 मध्ये शाकिराने श्रद्धानंदशी लग्न केले. नंतर दोघेही बंगळुरुला शिफ्ट झाले. आईच्या या निर्णयामुळे त्यांच्या मुली नाखुश होत्या. चारपैकी तिघी मुली आईपासून वेगळ्या राहू लागल्या. पण दुसऱ्या क्रमाकांची मुलगी सबा आईपासून नातं तोडू शकली नाही. मॉडेलिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला गेली, पण अध्येमध्ये ती आईला भेटायला जायची.
सबाला आईचा ठावठिकाणा लागेना
1991 मध्ये शाकिराची मुलगी सबाला तिच्या आईचा ठावठिकाणा लागत नव्हता. आईच्या दुसऱ्या पतीला तिच्याबद्दल वारंवार चौकशी करुनही, त्याने समाधानकारक उत्तर दिलं नाही. आधी त्याने शाकिरा गरोदर असल्यामुळे अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्याची थाप ठोकली. मात्र तिथे चौकशी केल्यानंतर अशा नावाची कुठलीच महिला कधीही तिथे दाखल झाली नसल्याचं तिला समजलं. दिवस पुढे सरकत होते, वर्ष बदललं. 1992 मध्ये सबाची चिंता वाढली आणि तिने बंगळुरुच्या अशोक नगर पोलिस स्टेशनमध्ये हेबियस कॉर्पससाठी अर्ज केला. तीन वर्ष श्रद्धानंदने कुटुंब, मित्र आणि राज्यातील कायदेशीर यंत्रणांच्या ससेमिरा चुकवला. आपली पत्नी सुट्टीवर असल्याचे भासवून बंगळुरुत तो आलिशान जीवन जगत होता.
मे 1994 मध्ये कर्नाटक पोलिसांना एका व्यक्तीकडून सुगावा लागला. शाकिराच्या मृतदेहाचा सांगाडा तिच्या स्वतःच्या घराच्या अंगणात खोलवर पुरलेला सापडला. शाकिराचा खून हा भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात भीतीदायक गुन्ह्यांपैकी एक मानला जातो. जेव्हा तिच्या खुनाचा खुलासा झाला, तेव्हा देशभर खळबळ उडाली होती.
कशी झाली शाकिराची हत्या?
28 एप्रिल 1991 रोजी शाकिराची हत्या करण्यात आली होती. तिला चहातून गुंगीचे औषध देण्यात आले होते, नंतर तिला बेशुद्धावस्थेत एका गादीवर ठेवण्यात आले. ती गादी शवपेटीसारख्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती. आधीच खोदलेल्या खड्ड्यात तो बॉक्स ठेवण्यात आला. म्हणजेच तिला जिवंतपणी गाडण्यात आलं. जेव्हा शाकिराचे अवशेष सापडले आणि गादी काढली गेली, तेव्हा तिचा एक हाताला गादीला घट्ट पकडलेला आढळला होता. म्हणजेच शुद्ध आल्यानंतर तिने बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी जिवाचं रान केलं असेल, मात्र बॉक्सच्या आत उमटलेले नखाचे ओरखडे तिच्या व्यर्थ प्रयत्नांची साक्ष देतात.
स्वामीने का केली पत्नी शाकिराची हत्या?
आपण शाकिराची संपत्ती मिळवण्याच्या उद्देशानेच तिच्याशी विवाह केला होता. मात्र तिने आपली संपत्ती चार मुलींना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपण तिच्या हत्येचा कट रचला, अशी कबुली श्रद्धानंदने दिली. 28 एप्रिल 1991 रोजी स्वामीने त्यांच्या घरातील सर्व नोकरांना सुट्टी दिली. शाकिरासाठी स्वतः चहा बनवून त्यातून श्रद्धानंदने तिला गुंगीचं औषध दिलं.
तिचा मृतदेह जमिनीत गाडल्यानंतर त्याने वरुन टाईल्स लावल्या. तीन वर्ष तो तिच्या दफन केलेल्या मृतदेहावरच पार्टी करायचा, दारु पिऊन मित्रांसोबत नाचायचा. त्यामुळेच या हत्याकांडाला डान्सिंग ऑन द ग्रेव्हही म्हटलं जातं.
गुन्हेगारीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा
हत्येची कबुली दिल्यानंतर स्वामी श्रद्धांनंदला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा खटला भारतीय न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा बनला आहे, कारण हे पहिले प्रकरण होते जिथे ही प्रक्रिया व्हिडीओवर रेकॉर्ड केली गेली होती. पुरावा म्हणून डीएनए चाचण्या आणि व्हिडिओ टेप घेण्याची ही भारतातील पहिलीच घटना होती.
1997 च्या शेवटी या खटल्याची सुनावणी झाली. 21 मे 2005 रोजी दिवाणी आणि सत्र न्यायाधीश बी. एस. तोताड यांनी स्वामी श्रद्धानंदला फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयात 12 सप्टेंबर 2005 रोजी न्यायमूर्ती एस. आर. बन्नूरमठ आणि ए. सी. कबीन यांनी श्रद्धानंदला फाशीची शिक्षा सुनावली. “दुर्मिळ प्रकरणांपैकी दुर्मिळ” असे न्यायमूर्ती एस आर बन्नूरमठ आणि न्यायमूर्ती एसी कबीन यांच्या खंडपीठाने म्हटले होते: “आरोपीने आपल्या पत्नीची हत्या सुनियोजित पद्धतीने केली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा देणे न्याय्य आहे” मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भान आणि न्यायमूर्ती तरुण चॅटर्जी यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. 22 जुलै 2008 रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रद्धानंदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
संबंधित बातम्या :