गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या आवळल्या, पुण्यात येण्यास बंदी

| Updated on: Mar 07, 2021 | 4:13 PM

कुख्यात गुंड गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. (Sharad Mohol Banned for Staying Pune)

गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या आवळल्या, पुण्यात येण्यास बंदी
कुख्यात गुंड शरद मोहोळ
Follow us on

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. काल सातारा पोलिसांनी गजा मारणेला अटक केली होती. त्यानंतर आता शरद मोहोळला बेड्या ठोकल्या आहेत. 26 जानेवारीला शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी त्याच्यावर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Sharad Mohol Banned for Staying Pune)

पुणे पोलिसांनी दिलेल्या कारवाईनुसार, शरद मोहोळला पुढील दोन महिने पुणे शहरात राहण्यास बंदी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

कारवाईचे कारण

15 दिवसांपूर्वीच शहरातला मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ याची कातिल सिद्दिकीच्या खुनातून मुक्तता झाल्यानंतर मोहोळ टोळीनेही मारणे टोळीसारखाच ‘धुरळा’ केला होता. मात्र त्यावेळी पुणे पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती.

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुणे शहरातील मोहोळ टोळीचा तो म्होरक्या आहे. येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप होता. 15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली. त्यानंतर मोहोळ टोळीनेही मारणे टोळीसारखाच ‘धुरळा’ केला होता.

दरम्यान, शरद मोहोळविरोधात आता कलम 143, 188, 37 (3) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, 51 बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरद मोहोळ 26 जानेवारीला ज्या कार्यक्रमाला हजर राहिला होता, त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला कुख्यात गुंड गजा मारणेला (Gajanan marne) सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं आहे. क्रेटा गाडीतून त्याची जावळी-महाबळेश्वरात हवा चालली होती. अखेर सातारा पोलिसांना त्याची चाहूल लागताच पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन त्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी अटक केली आहे. (Sharad Mohol Banned for Staying Pune)

संबंधित बातम्या : 

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या