पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येमधील मुख्य आरोपींना अटक झाली आहे. मुळशीमधीलच गुंड रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार यांनी मोहोळला संपवलं. आज आरोपींना कोर्टात दाखल केल्यावर आणखी नवीन माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींनी बैठक घेत सापळा रचला असल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केला आहे. पोलिसांनी कोर्टात सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दोन्ही मुख्या आरोपींना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. शरद मोहोळ हत्येच्या एक महिना आधी दोन्ही आरोपींनी महत्वाची बैठक बोलावली होती. याच बैठकीत दोन्ही आरोपींनी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला. इतकंच नाहीतर या बैठकीमध्ये अनेक जण सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे. या दोन मुख्य आरोपीसोबत आणखी एक आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे हा तिसरा आरोपी तिसरा कोणता भाई आहे याकेड सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जो तिसरा आरोपी आहे त्याच्यासोबतच विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांची बैठक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये असलेला तिसरा मुख्य आरोपी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा आरोपी आता पोलिसांच्या रडावर असून त्याला पकडण्यासाठी पोलीस आपली सूत्र हलवतील. मुख्य आरोपी शेलार आणि मारणे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी आहे. पोलीस त्यांच्याकडून तपासात तिसऱ्या मुख्य आरोपीविषयी माहिती काढून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.