पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या 5 जानेवारी 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याचाच साथीदार मुन्ना पोळेकर याने गोळ्या मारून त्याला संपवला. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळला संपवण्यासाठी खूप आधीपासूनच कट रचला जात होता. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याला पेरलं गेलं होतं, त्यालाच मोहरा बनवत मोहोळचा काटा काढला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. रोज नवनवीन खुलासे होत असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
शरद मोहोळला संपवण्याआधी मुख्य आरोपा मुन्ना पोळेकर आणि नितीन कानगुडे यांना भूगावमध्ये गोळीबार केला होता. 17 डिसेंबरला हा गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे. त्यादिवशी मुन्ना पोळेकरने अजय सुतार याला चांदणी चौकामध्ये बोलावून घेतलं होतं. पोळेकर आणि कानगुडे सुतारला भूगावच्या घरी घेऊन गेले. नितीन कानगुडे याच्या पार्किंगला बसल्यावर दोघांनी त्याला मोहोळला संपवण्याच्या कटाची माहिती दिली. सुतारने त्यांना नकार दिला आणि तिथून पळून जाण्यााचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सुतारवर गोळीबार केला होता.
एक गोळी अजय सुतार याच्या पायामधून आरपार झाली. तर दुसरी गोळी त्याच्या पायाला पायाला चाटून गेली होती. सुतार गंभीर झाला होता, त्यावेळी या दोघांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं. जर याबद्दल बाहेर कुठे काही बोलला तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अजय सुतारही गप राहिला. जर सुतारने याबद्दल पोलिसांना माहिती दिली असती तर कदाचित आज शरद मोहोळ जिवंत असतानाच पोळेकर आणि कानगुडे तुरूंगात असते.
दरम्यान, शरद मोहोळ याला संपवण्यासाठी जी शस्त्र मागवली गेलीत त्यासाठी पैसे दिलेल्यांची नावं समोर आली आहेत. नितीन अनंता खैरे (वय 34, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय 24) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) या तिघांनी पैसे दिले होते. या तिघांनी पोलिसांनी अटक केली आहे.