पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | भरदुपारची वेळ.. शहरातली एक अरूंद गल्ली… अगदी दाटीवाटीने इमारती उभ्या असलेल्या त्या गल्लीत एकाच वेळेला जेमजेतम दोन गाड्या जाऊ शकतील एवढीच जागा होती. इमारतीतील त्या छोट्याशा घरांच्या गॅलऱ्यांमध्ये एकीकडे कपडे वाळत घातलेले तर दुसरीकडे थोड्याशा जागेत तिथेच बादल्या, ड्रम्स, कुठे फुलांचा कुंड्या ठेवलेल्या.. दुपारची वेल असल्याने बाहेर कोणीच दिसत नव्हतं, सगळेजण आपापल्या घरात बसलेले. त्या अरूंद गल्लीत चालायलाही पुरेशी जागा नसताना, तिथेच रस्त्याच्या दोहोबाजूस सायकल, बाईक्स आणि रिक्षा दाटीवाटीने उभ्या केलेल्या होत्या.
दुपारच्या वेळेस निर्मनुष्य असलेल्या त्या गल्लीतून अचानक त्या गल्लीतून चार-पाच माणसं चालायला सुरूवात करतात. पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला माणूस पुढे चालत असतो. त्याच्या मागूनच चालणाऱ्या, काळसर रंगाचा शर्ट घातलेल्या एका इसमाने त्याच्या पाठीवर हात ठेवला. काय झालं विचारायला तो इसम मागे वळला न वळला तोच, काळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या माणसाने बंदूक काढून त्याच्या छाताडावर ताणली आणि धाड.. धाड.. धाड.. सटासट गोळ्या त्याच्या बंदुकीतून सुटल्या आणि त्या माणसाच्या अंगात घुसल्या. शेजारून आलेल्या, टोपी घातलेल्या माणसानेही नेम धरून त्याच्या अंगावर बंदूकीतून गोळ्यांचा वर्षाव केला.
चालता फिरता असलेला तो माणूस क्षणार्धात जमीनीवर धाडकन कोसळला आणि गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला. त्याच्या सहकाऱ्याने त्या इसमाला वाचवण्यासाठी धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला. मारेकरी पळून गेले आणि तो इसम गंभीर जखमी होऊन खाली पडला होता. त्याचा सहकारी आणि लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीने गोळ्या लागून जमीनीवर पडलेल्या त्या इसमाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर जखमी झालेल्या त्याच्या अंगात उठायचे त्राणच नव्हते. अखेर त्यांनीच दोन्ही हाताला धरून त्याला कसेबसे उठवले.
तर तिथे बाईकजवळ उभ्या असलेल्या एक-दोन लोकांनी गोळीबारामुळे आडोसा शोधत तिथल्याच बिल्डींगमध्ये धाव घेतली. ठो-ठो गोळ्यांचा आवाज ऐकून आपापल्या घरात निवांतपणे बसलेले नागरिक हादरलेच. निळ्या रंगाची साडी नेसलेली एक स्त्री आणि भगव्या रंगाचा टीशर्ट घातलेली एक तरूणी तिथल्याच घराच्या पोटमाळ्यावर गॅलरीत आले. आणि काय झालं ते पाहू लागले. आजूबाजूच्या इमारतीतील लोकही खिडक्या, बाल्कन्यांमध्ये गोळा झाले आणि वाकून-वाकून पाहू लागले. पण एव्हाना आरोपी पळून गेले होते.
चित्रपटाचा सीन नव्हे खऱ्या आयुष्यातील थरारक घटना
एखाद्या चित्रपटाचा सीन शोभावा असा हा थरारक प्रसंग प्रत्यक्षात घडलाय आणि तोही विद्येचं माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यातच. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या गोळया झाडण्यात आल्याने संपूर्ण पुणं हादरलं. शहरात एकच खळबळ माजली. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर या शरद मोहोळच्या साथीदारानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं.
लग्नाच्या वाढदिवशीच शरद मोहोळची हत्या
धक्कादायक गोष्ट म्हणजे गुंड शरद मोहोळवर हल्ला करण्यापूर्वी साहिल आणि इतर साथीदारांनी शरदच्या घरीच जेवण केलं होतं. शरद मोहळच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याचे सर्व साथीदर घरी जेवायला जमले होते. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले आणि थोड्याच अंतरावर जाऊन त्यांनी त्यांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले . त्यामध्ये या गोळीबाराचा संपूर्ण थरारक प्रसंग कैद झाला आहे.
हल्लेखोरांनी अगदी जवळूनच शरद याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी पाहिला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मोहोळ याचा मृत्यू झाला.
पोलिसांना मिळाले फुटेज
शरद मोहोळ याच्यावरील हल्लाचे फुटेज शनिवारी समोर आले. गेल्या अनेक वर्षांपासून शरद मोहोळ याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केल्याचे या फुटेजमध्ये दिसले आणि तिथून पळ काढला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोण आहेत ते आठ आरोपी ?
– साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड)
– विठ्ठल किसन गडले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड)
– अमित उर्फ अमर कानगुडे (वय २४, रा. धायरी)
– नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव)
– चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती)
– विनायक संतोष गाव्हणकर (वय २०, रा. कोथरुड),
– रवींद्र वसंतराव पवार (वय ४०)
– संजय रामभाऊ उउ्डाण (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)