प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 8 फेब्रुवारी 2024 : पुण्यात 5 जानेवारीला दिवसाढवळ्या, कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गँगवॉर, जुन्या अपमानाचा बदला, यातून हा खून करण्यात आला. . याप्रकरणी 24 तासांत 8 आरोपींना अटक केली. तर त्यानंतर आणखी 15 आरोपींनाही अटक केली. या हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपी, मास्टमाईंड गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथून अटक केली. तर काल गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर यालाही अटक केली. या हत्या प्रकरणाचा पोलिस अजूनही कसून तपास करत असून रोज नवनवी माहिती समोर येत असते.
आता याप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. अभिजित अरुण मानकर याच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर आली आहे. शरद मोहळ याची हत्या करण्यासाठी अभिजीत मानकर यानेच मोहोळच्या मारेकऱ्यांना कॅश आणि सिम कार्ड दिले होते, असे उघड झाले आहे. अभिजीत मानकर हा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात होता. त्यांच्यामध्ये जे संभाषण झालं त्याच्या ऑडिओ क्लिप्स पोलिसांना मिळाल्या आहेत. आता या ऑडिओ क्लिप्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी कोर्टात दिली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणातील आरोपी अभिजित मानकरला 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हत्येनंतर मास्टरमाईंड करत होता देवदर्शन
या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, मास्टरमाईंड गणेश मारणे हा फरार होता. अखेर महिनाभर तपास करून, शोध घेऊन सिनस्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्या चौकशीतूनही महत्वपूर्ण माहिती समोर आली. शरद मोहोळच्या हत्येनंतर गणेश मारणे हा तातडीने फरार झाला. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. एवढंच नव्हे तर या हत्येनंतर फरार असताना त्याने अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शनही केलं. सुरूवातीला गणेश मारणे हा तुळजापूरला गेला आणि तेथील मंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतल्याची माहिती तपासात उघड झाली. नंतर तो देशभरात फिरत होता. पोलिसांना चकवण्यासाठी तो केरळला गेला, तिथेही त्याने अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शन केल्याचं समोर आलं.
शरद मोहोळच्या पत्नीला धमकी
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला एक महिना झाल्यावर शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना मेसेज आला आहे. या मेसेजमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मुन्ना पोळेकर याच्या नावाने अकाऊंट बनवण्यात आलं आहे. या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोशल मीडियावर स्वाती मोहोळ यांना मेसेज आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा कोण आहे ? याचा गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.