Sharmila Thackeray on Yashshree Shinde murder case : नवी मुंबईतील उरणमध्ये झालेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 20 वर्षाच्या यशश्री शिंदे या तरुणीची दाऊद शेख याने निर्घृण हत्या केली. यानतंर तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडुपात फेकला. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं. शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या. आता याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
शर्मिला ठाकरे यांनी यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी नुकतंच नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “आता तरी शक्ती कायद्याला मंजुरी द्यावी, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, अशी मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे.
“दहा वर्ष झाल्यानंतर शक्ती कायदा अमलांत आणला नाही, या वर्षी हा कायदा पास करा. दोन महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कोणताही आरोपीला सुटला नाही पाहिजे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा”, असे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाले.
“गेल्या तीन दिवसांत तीन मुलींची… किती हिंस्त्रपणा. निर्भया प्रकरणात १६ वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलांमध्ये विकृती आहे, त्यांना फाशी द्या. या लोकांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे. पोलीस काय करु शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. त्यामुळे याच वर्षी शक्ती कायदा पास करावा, अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे”, असे शर्मिला ठाकरेंनी यावेळी म्हटले.