कोलकाता येथील घटनेवरून संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे, मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्याा मुद्यावरून गदारोळ माजला आहे. ही परिस्थिती असतानाच आता आंध्र प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. राज्यातील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधील मुलींच्या हॉस्टेलमध्ये कॅमेरा लपवलेला आढळल्याने एकच खळबळ माजली. मुलींचे 300 हून अधिक व्हिडीओ आणि फोटो लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच गदारोळ सुरू झाला असून विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीटेकच्या विद्यार्थ्याला घेतलं ताब्यात
रिपोर्ट्सनुसार, आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका इंजीनियरिंग कॉलेजमधील मुलींच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे सापडले आहेत. विद्यार्थिनींनी निदर्शने करत कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी बीटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप व मोबाईलही जप्त केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गर्ल्स हॉस्टेमधील वॉशरूममध्ये लावलेल्या या व्हिडीओनंतर विद्यार्थिनींचे 300 हून अधिक व्हिडीओ आणि फोटो लीक झाल्याचे समोर आले. हे प्रकरण एसआर गुडलावलेरू अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संबंधित आहे. वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर मुलींनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली.
प्रेयसीला ब्लॅकमेल करण्यासाठी लपवला कॅमेरा
मुलींच्या हॉस्टेलच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे प्रकरण गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. काही विद्यार्थिनींना त्यांच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला. यानंतर त्या खूप घाबरल्या. बीटेकच्या विद्यार्थ्याने त्याच्या प्रेयसीला ब्लॅकमेल करण्यासाठी बाथरूममध्ये कॅमेरा बसवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज्यातील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये छुपा कॅमेरा लपवल्याची घटना समोर आल्यावर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत कडक कारवाईचे संकेत दिलेत. कॉलेजच्या वसतिगृहात छुपे कॅमेरे बसवण्याचा मुद्दा कॉलेज व्यवस्थापनाने दडपण्याचा प्रयत् केला होता, अशी माहिती देखील समोर आलीआहे. विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये निदर्शने केल्यावर प्रसारमाध्यमांना प्रवेश रोखण्यासाठी कॉलेजने गेट बंद केले होते. अशी घटना समोर आल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.